कोल्हापूर : बालींगा (ता. करवीर) येथील अंबिका ज्वेलर्सचा मालक सराफा संतोष पोवाळकर याच्याकडून फसवणूक झालेल्यांची व्याप्ती वाढत आहे. मंगळवारी आणखी पाच जणांनी पोबारा केलेल्या सराफाविरोधात तक्रारी दाखल झाल्या. तक्रारदारांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत फसवणूक केलेल्या रकमेचा आकडा दोन कोटी २० लाखापर्यंत पोहोचला आहे.
कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून सराफ व्यावसायिक संतोष पोवाळकर हा फरार झाला आहे. त्याने पिग्मी, सुवर्ण ठेव योजना यातून अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या मोठमोठ्या रकमा गुंतवल्या. महिलांनी सोन्याच्या हव्यासापोटीही मोठ्या रकमा सराफांकडे गुंतवल्या. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाल्याने लाखो रुपये गुंतवणूक केलेल्यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या.
आतापर्यंत सुमारे ३६ तक्रारदारांनी करवीर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या तक्रारी दिल्या आहेत. मंगळवारी सुमारे पाच तक्रारदारांनी सुमारे सहा लाख रुपयाची फसवणूक केल्याच्या तक्रारी दिल्या. संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
मोठे गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत
मोठ्या रकमा गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार अद्याप तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. गुंतवणूक केलेला पैसा कोठून आणला, याची माहिती द्यावी लागणार असल्याने हे गुंतवणूकदार तक्रार देण्याबाबत अद्याप संभ्रमास्थेत आहेत; पण अशा मोठ्या गुंतवणूकदारांनीही तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले.