भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : शहरातील नगररचना (टीपी) कार्यालयातील दिरंगाई, गलथान कामकाज अर्जदाराच्या जीवावर बेतत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. वारंवार हेलपाटे मारूनही माहिती मिळत नसल्याने एकजण दुसरा मजल्यावरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना आठवड्यापूर्वी घडली आहे. बांधकाम परवाना आणि पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी विविध प्रकारे अडवणूक करून टक्का वसूल केले जात असल्याच्याही तक्रारी आहेत.
टीपीत मनमानी, दिरंगाई, वेळकाढू कामकाज चालते हे जगजाहीर आहे. म्हणूनच महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विशेष लक्ष घालून कामकाज पारदर्शक, गतीमान करण्यासाठी विशेष शिबिर घेऊन प्रलंबित प्रकरणे मार्गी लावत आहेत; पण याचा प्रभाव अल्पकाळापुरताच राहतो आणि पुन्हा मूळ वळणावर कामकाज जात आहे. त्याचा त्रास घर बांधकाम करणाऱ्यांना होत आहे. प्रामाणिकपणे बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फटका बसत आहे. टीपीत कोणतीही माहिती सहज मिळत नाही. बहुतांशी अधिकारी, कर्मचारी माहिती लपवून देवघेवीवर अधिक लक्ष केंद्रीत करतात, असा अनेकांचा अनुभव आहे.
या कामकाजाला कंटाळून काही बांधकाम व्यवसायिकांनी टीपीतील मागणी पूर्ण करून विविध प्रकारचे परवाने घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्तीच केली आहे. तो कर्मचारी आला की टीपीतील अधिकारी त्यांचा सन्मान करून गतीने काम करून देतात. याउलट सामान्यांना बांधकाम परवाना आणि विविध प्रकारच्या कामांसाठी वारंवार हेलपाटे घालावे लागतात. कार्यालयात आले तरी संबंधित टेबलावरील कर्मचारी, अधिकारी दिशाभूल, बेजबाबदार उत्तर देतात.
माहिती अधिकारीच माहिती लपवतात
टीपीतून किती बांधकाम परवाने, भोगवटा प्रमाणपत्र, जोता चेकिंग, अनामत रक्कम, ले-आऊट मंजुरी, एकत्रिकरण, विभाजनाची माहिती उपशहर रचनाकार आणि माहिती अधिकारी मस्कर यांच्याकडे ‘लोकमत’ने मागितली. त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ करीत तुम्ही लेखी मागा, आम्ही फक्त आयुक्तांनाच माहिती देऊ शकतो, असे उत्तर दिले, असे त्यांचे बेजबाबदार उत्तर प्रशासक डॉ. बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिले. इतके सर्व केल्यानंतर मस्कर यांनी माहिती देण्यास संबंधित लिपिकास सांगितली पण दिवसभरात माहिती अपुरीच मिळाली.
आत्महत्येचा प्रयत्न मग धावपळ..
जरगनगरातील एकाने अपार्टमेंटचा बांधकाम परवाना, नकाशा, भोगवटा प्रमाणपत्राची माहिती टीपीमध्ये ३० डिसेंबर २०२१ मध्ये माहिती अधिकाराखाली मागितली. हेलपाटे मारले तरीही माहिती मिळत नसल्याने आठवड्यापूर्वी नगररचना कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
माहिती देता येत नाही. आम्ही फक्त आयुक्तांनाच माहिती देऊ शकतो. तुम्हाला माहिती हवीच असल्यास लेखी द्या. आम्ही विचार करू. रमेश मस्कर, प्रथम माहिती अधिकारी, नगररचना कार्यालय
शुक्रवार पेठेतील घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी परवाना अर्ज जानेवारी २०२१ मध्ये टीपीमध्ये दाखल केला आहे. वारंवार पाठपुरावा करत आहे. प्रत्येक वेळी नवनवीन कारणे सांगून परवाना देण्याचे टाळले जात आहे. मी पैसे देऊन काम करून घेत नाही म्हणून मला परवाना मिळत नाही, असे वाटू लागले आहे. - एक त्रस्त शासकीय कर्मचारी