लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाविकास आघाडीचे सरकार असतानाही शिवसेनेच्या आमदारांच्या पराभवास कारणीभूत ठरले त्या आमदार विनय कोरे यांना जिल्ह्यातील दोन्ही मातब्बर नेते निधीमध्ये झुकते माप देत असल्याची तक्रार शिवसेनेच्या चार माजी आमदारांनी पक्षाचे संपर्क मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. त्यांनी या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात येते.
जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पंचवार्षिकपासून कोरे भाजपच्या गोटात आहेत. विधानसभेला निवडून आल्यावरही त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे; परंतू त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. कोरे यांची पन्हाळा, शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यांत ताकद आहे. त्यांचे महाडिक गटाशी पारंपरिक राजकीय वैर आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कोरे यांना पाठबळ देतात. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना जे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पराभवास कारणीभूत ठरले, त्यांना सत्तारूढ नेत्यांनी जवळ करायचे कारण नाही, अशी या माजी आमदारांची भावना आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या विविध सभापतींनाही निधीचे वाटप करताना अथवा कोणताही निर्णय घेताना काहीच स्वातंत्र्य राहिलेले नाही. बांधकाम सभापतीला काही कोटींच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार आहेत; परंतु प्रत्यक्षात तो स्थानिक नागरिकांनी आग्रह धरला म्हणून कुठे दोन किलोमीटरचा रस्ता करू शकत नाही. आरोग्य सभापतींचीही अशीच कुचंबणा होत आहे. सगळे अधिकार दोन्ही मंत्र्यांनी त्यातही ग्रामविकास मंत्र्यांनी आपल्याकडे एकवटल्याचे या माजी आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यात अडचणी येत आहेत व आपल्या पक्षाचे सरकार आल्याचा राजकीय फायदा आम्हाला काही होत नसल्याची या माजी आमदारांची तक्रार आहे.