सांगरूळ : पासार्डे (ता. करवीर) येथे स्वामित्व योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेले संपत्ती कार्ड व ड्रोनद्वारे केलेले सर्वेक्षण हे सध्य स्थितीतील असलेल्या मलमत्ता नोंदणीशी व गावठाण नकाशाशी मिळतेजुळते नाही. त्यामुळे पुन्हा सीमांकन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शुक्रवारी भूमिअभिलेख उपाधीक्षक पल्लवी उगले यांनी गावात येऊन नागरिकांच्या हरकतींचे निरसन करण्याचा प्रयत्न केला; पण नागरिकांनी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत भू-संपत्तीधारकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित केली जात आहेत. यावेळी पहिल्या टप्यात करवीर तालुक्यातील सुमारे सहा गावांमधील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेच्या नोंदणीचे हक्क देण्याच्या दृष्टीने त्यांच्या नावाची मालमत्ता पत्रे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यामध्ये पासार्डे या गावाचाही समावेश आहे. भूमिअभिलेख कार्यालयाकडून एप्रिल २०२० ला पासार्डे येथील भूसंपत्तीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२० रोजी पासार्डे गावाचे सीमांकन करण्यात आले. यानंतर शुक्रवारी मालमत्ता पत्रे सुपूर्द करण्याच्या दृष्टीने भूमिअभिलेख उपाधीक्षक पल्लवी उगले यांनी पासार्डे येथे नागरिकांच्या हरकतींचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी करण्यात आलेला सर्व्हे चुकीचा असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रत्यक्षात नावाची मलमत्ता आणि ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणांती मलमत्ता यामध्ये मोठी तफावत असून, प्रत्यक्षातील गावठाण नकाशा आणि ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाचा नकाशा जुळत नसल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, काही नागरिकांनी तर कधी हा सर्व्हे झाला हेच माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी उपसरपंच रमेश पाटील, बाजीराव चौगले, के. के. चौगले, कृष्णात चौगले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्यांनाही सर्वे अमान्य
विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कांबळे व अरुण चौगले यांनीही हा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सांगितले. हा सर्वे सर्व लोकांना विश्वासात घेऊन करण्याची मागणी केली.
प्रतिक्रिया
पासार्डे गावचा झालेला सर्व्हे व्यवस्थित झाला असून मोजक्या चार लोकांच्या तक्रारीसाठी संपूर्ण सर्व्हे नवीन करण्याची मागणी चुकीची आहे. ज्या लोकांची तक्रार आहे त्याचे निरसन केले जाईल.
-पल्लवी उगले, भूमिअभिलेख उपाधीक्षक