कोल्हापूर : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे आॅगस्ट महिन्यात होत असलेल्या कन्यागत महापर्वकालासाठी रस्ते डांबरीकरण, घाट बांधणे, वीज कंपनीचे खांब बसविणे, आदी विविध विकासकामे सुरू असून ती आतापर्यंत ५० टक्के इतकी झाली आहेत. रस्ते डांबरीकरणांचे काम मेअखेर, तर उर्वरित कामे जूनअखेर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी येथे संबंधित यंत्रणेला यावेळी दिल्या. नृसिंहवाडी येथील ‘कन्यागत महापर्वकाल २०१६’ साठीच्या आराखड्यातील कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सैनी बोलत होते. यावेळी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर. एस. पाटील, सहायक नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यांच्यासह संबंधित विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ‘कन्यागत’साठी तयार केलेल्या आराखड्यानुसार सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यात रस्त्यांची कामे, घाटांची कामे, विजेचे रस्त्यावरील वेडेवाकडे खांब बाजूला करणे, पथदिवे बसविणे, डीपी बसविणे, अडथळा ठरणाऱ्या विजेच्या खांबांचे स्थलांतरण करणे, आदी कामांचा समावेश आहे. तीन आठवड्यांपूर्वी या कामांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते डांबरीकरणाचे काम ३१ मेअखेर पूर्ण करावयाचे आहे. रस्त्यांची कामे सुमारे ५० कोटी रुपयांची आहेत. तसेच नदीवर बांधण्यात येणाऱ्या घाटाचे काम व वीज कंपनीच्या माध्यमातून खांब बदलणे, स्थलांतरण करणे, डीपी बदलणे, आदी कामे जूनपर्यंत करण्याचे ठरले. पहिल्या टप्प्यात करावयाच्या सर्व कामांचे सूक्ष्म नियोजन करून सर्व विभागांनी कृती आराखड्यानुसार कार्यवाही करावी; कसल्याही प्रकारची हयगय करू नये, अशी सूचनाही डॉ. सैनी यांनी केली. यावेळी कन्यागत महापर्वकालानिमित्त करावयाची प्रसिद्धी, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, सी. सी. टीव्ही यंत्रणा, दळणवळण सुविधा, आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.कन्यागत महापर्वकाळासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांपैकी ५० टक्के कामे आतापर्यंत झाली आहेत. नियोजित वेळेत ही सर्व कामे होतील. कुंभमेळ्याच्या धर्तीवर ‘कन्यागत’चा कार्यक्रमही भव्य-दिव्य करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याच्या प्रसाराचेही नियोजन सुरू आहे.- उल्हास पाटील, आमदार
‘कन्यागत’ची ५० टक्के कामे पूर्ण
By admin | Published: May 19, 2016 12:35 AM