कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची नाबार्डने तपासणी पूर्ण केली. ही तपासणी नियमित असली, तरी नाबार्डचा अहवाल खूप महत्त्वाचा असतो. गेले १५ दिवस दोन अधिकाऱ्यांनी तपासणी केली असून, नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक उदय शिरसाळकर यांनी कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.जिल्हा बॅँकेच्या लेखापरिक्षणाबरोबरच नाबार्डची तपासणी महत्त्वाची असते. नाबार्डच्या निकषानुसारच बॅँकेचा कारभार करावा लागतो. नाबार्डच्या निकषाचे पालन न केल्यानेच जिल्हा बॅँकेवर २००९ ला प्रशासक मंडळ आले.
गेले आठ-नऊ वर्षे जिल्हा बॅँकेची गाडी रूळावर येण्यास लागली. बॅँकेचे संचालक मंडळ कार्यरत झाल्यानंतर बॅँकेच्या कारभाराला खऱ्या अर्थाने शिस्त आली. काटकसरीचा कारभार करत बॅँकेला नफ्यात आणले. राज्यातील जिल्हा बॅँकांच्या नफ्यात कोल्हापूर जिल्हा बॅँकेचा नफा सर्वाधिक राहिला.गेले १५ दिवस नाबार्डच्या दोन अधिकाऱ्यांनी बॅँकेच्या कामकाजाची तपासणी केली. मंगळवारी तपासणी पूर्ण झाली असून, नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक उदय शिरसाळकर यांनी कामकाजाचे कौतुक केले. एकूणच बॅँकेच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.