कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम महिन्यात पूर्ण करा, अशा सूचना मंगळवारी आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.प्रतिभानगर येथे उभारण्यात येणाऱ्या पानसरे यांच्या स्मारकाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, स्मारकाच्या परिसराचे सुशोभीकरण त्याच बरोबर, स्मारक परिसरात तयार करण्यात येत असलेले ग्रंथालय आणि इतर काही अपूर्ण कामे आहेत. या कामांची आमदार पाटील यांनी पाहणी केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव उपस्थित होते.स्मारकाच्या उर्वरित कामाकरिता २८ लाखांचा निधी आवश्यक आहे. त्यानुसार हा निधीदेखील तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली. उर्वरित कामांचा नियोजनाकरिता महापालिका प्रशासकासोबत बैठक घेऊन कामाचा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारीला गोळी बार झाला होता. त्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले. त्यामुळे पानसरे यांचा २० फेब्रुवारी हा शहीद दिन म्हणून मानला जातो. परिणामी, या शहीद दिनापूर्वी प्रशासनाने सर्व कामे पूर्ण करावीत, अशी मागणी गोविंद पानसरे संघर्ष समितीने केली. यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, आदिल फरास, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, शाहीर सदाशिव निकम, मुकुंद कदम, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, प्रशांत आंबी उपस्थित होते.
गोविंद पानसरे यांचे स्मारक महिन्यात पूर्ण करा, सतेज पाटलांनी अधिकाऱ्यांना केल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 3:34 PM