कोल्हापूर : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या पहिल्या टप्यातील पैजारवाडी ते शिये फाट्यापर्यंतच्या कामासाठी भूूसंपादनाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करावे. त्यानंतर कामाची निविदा प्रसिध्द करावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिली.
कोल्हापूर-रत्नागिरी मंजूर रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीत ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबा ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते शिये फाटा असा एकूण ७८ किलोमीटरच्या रस्ता मंजूर आहे. हे काम दोन टप्प्यांत होणार आहे. आंबा ते पैजारवाडी रस्त्यासाठी १६५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. ते एक महिन्यात पूर्ण करावे. पैजारवाडी ते शिये फाट्यावरील जमीन संपादनाचे काम ३ जूनपूर्वी पूर्ण करावे. याशिवाय पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगावजवळ वारंवार अपघात होत आहेत. अपघात टाळण्यासाठीच्या उपाय योजना तातडीने कराव्यात.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंधारकर म्हणाले, कोल्हापूर रत्नागिरी महामार्गातील ७८ किलोमीटरच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी २६९२ कोटींची गरज आहे. या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. या रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. हे काम गतीने होणे आवश्यक आहे. पहिल्या टप्यातील पैजारवाडी ते शिये फाट्यापर्यंतच्या रस्त्यासाठी ९० टक्के जमिनीचे भूसंपादन झाल्यानंतर निविदा प्रसिध्द करण्यात येईल.
भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी हेमंत निकम म्हणाले, कोल्हापूर - रत्नागिरी मंजूर रस्त्यासाठी भूसंपादनची प्रशासकीय कार्यवाही गतीने केली जाईल. ३० जूनपर्यंत पहिल्या टप्यासाठी आवश्यक जमिनीचे संपादन केले जाईल. यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
यावेळी खासदार मंडलिक यांनी रस्त्याचे काम करताना शेतकऱ्यांच्या तक्रारी कमी येतील, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली. बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे सर्व्हेअर आर. डी. काटकर, भूमी अभिलेखचे अधिकारी वसंत निकम आदी उपस्थित होते.