कोल्हापूर : कळंबा ते फुलेवाडी बाह्यवळण रस्त्यातील गळती तसेच ड्रेनेजची कामे १० दिवसांत पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यावरील अडचणी आताच पूर्ण करा; नाही तर वारंवार गळती लागल्यास हा रस्ता पूर्ण करणे अडचणीचे होईल, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना गुरुवारी समज दिली.फुलेवाडी रिंग रोड ते कळंबा साईमंदिर बाह्यवळण रस्त्याचे काम नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू आहे. या कामाची पाहणी आमदार पाटील व स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत केली.लोकांना त्याचा त्रास होत आहे. योग्य पद्धतीने कामाचे नियोजन करा आणि वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या. ठेकेदार ‘निर्माण कन्स्ट्रक्शन’ यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १० ते १२ फुटांची झाडे लावण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.यापूर्वी स्थायी समितीचे सभापती देशमुख यांनी फिरती करून गळती व ड्रेनेज लाईनची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांपैकी बरीच कामे अद्याप अपूर्ण असल्याने सदरचा रस्ता पूर्ण करण्यात अडचण येत असल्याचे ठेकेदार अरुण पाटील यांनी सांगितले. साधारणत: पाच किलोमीटर रस्त्यापैकी साडेतीन किलोमीटर रस्ता काम करण्यासाठी ताब्यात दिला असल्याचे त्यांनी सांगितले.उपजल अभियंता भास्कर कुंभार यांनी राहिलेली गळतीची पाच कामे चार दिवसांत पूर्ण करीत असल्याचे सांगितले. चिव्यांचा बाजार येथील मेन लाईनवरील रिड्युसर व बेंड उद्यमनगर येथे करण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील यांनी ड्रेनेज लाईनची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले.
उपशहर रचनाकार एन. एस. पाटील यांनी कणेरनगर रिंग रोड येथील रि.स.नं. १०४२/क/४ व ५/१३ या मिळकतीची ४० मीटर जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असून याबाबत संबंधित मालकाशी चर्चा झाली असून, त्यांना उद्या नोटीस लागू करीत असल्याचे सांगितले.यावेळी परिवहन सभापती अभिजित चव्हाण, प्रभाग समितीचे सभापती रिना कांबळे, नगरसेविका वनिता देठे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, इंद्रजित बोंद्रे, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पी. डी. माने, जी. के. सी. कंपनीचे राजेंद्र माळी व पाणीपुरवठा व ड्रेनेज अमृत योजनेचे ठेकेदार उपस्थित होते.