कोल्हापूर : राज्यात येत्या बुधवारपासून (दि.१४ एप्रिल) संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे समजते. सरकारचा लॉकडाऊनचा निर्णय झाला आहेच, फक्त मंगळवारी गुढीपाडव्याचा सण असल्याने लॉकडाऊन लांबणीवर टाकला असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सहा लाखांवर गेली आहे. रुग्ण सापडण्याची मागील सात दिवसांतील सरासरी ५१ हजार ४६९ इतकी आहे. ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने पहिल्या टप्प्यात रात्रीची संचारबंदी व वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. त्यातील पहिला वीकेंड लॉकडाऊन सध्या सुरू आहे. त्यामुळे हाच लॉकडाऊन पुढे कायम करतील, अशी भीती लोकांच्या मनांत होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी शनिवारी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कडक निर्बंध लावावे लागतील, असे सुतोवाच केले आहे. प्रत्यक्षात सोमवारपासून लॉकडाऊन वाढवलेला नाही. सोमवारपासूनच व्यापाऱ्यांनीही दुकाने सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी पाडवा सण असल्याने दोन दिवस व्यवहार सुरू ठेवून बुधवारपासून पुन्हा किमान दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन केला जाऊ शकतो. कडक लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे. आता कडक लॉकडाऊन होणार, अशी लोकांचीही मानसिकता झाली असून, त्यांना तयारीसाठीही दोन दिवस मिळू शकतात, असे सरकारला वाटते.