कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम येत्या १५ आॅगस्टपूर्वी सुरू करण्याचा व ते काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्णय महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लोकभावना लक्षात घेऊन या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही महापौर अश्विनी रामाणे यांनी दिली. कॉ. पानसरे यांच्या नियोजित स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी महापौर रामाणे यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.महापौर रामाणे यांनी, महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कॉ. पानसरे यांचे स्मारक उभारण्यासाठी सुमारे २० लाखांची तरतूद केली असल्याचे सांगितले.स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनीही, निधीअभावी स्मारकाचे काम रखडणार नसल्याचे सांगितले, तसेच स्मारक उभा करण्यापूर्वी तांत्रिक बाबी पूर्ण करून घ्याव्यात, असे आदेश अधिकाऱ्यांना यावेळी दिले. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी स्मारकाचे काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिल्याचे सांगितले.सतीशचंद्र कांबळे म्हणाले, यापूर्वी २४ जुलै २०१५ रोजी स्मारकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम वि. स. खांडेकर शाळा परिसरात झाला आहे. या स्मारकासाठी आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी आराखडा तयार केला असून स्मारकासाठी किमान २५ ते ३० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी विविध कारणांनी स्मारकाच्या कामाला विलंब झाला आहे. त्यामुळे या स्मारकाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करावे. स्मारकाच्या जागेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा तांत्रिक अडथळा आला आहे तो महापालिकेने दूर करावा, असे आवाहन नामदेवराव गावडे यांनी केले. यावेळी चर्चेत बी.एल. बर्गे, रघु कांबळे आदींनी सहभाग घेतला.चर्चेनंतर तीन महिन्यांत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी भाकपच्या शिष्टमंडळाने महापौर रामाणे यांना निवेदन दिले. प्रशांत आंबी, अनिल चव्हाण, महादेव आवटे, मुकुंद कदम, नामदेवराव पाटील, एम. बी. पडवळे, दिलावर मुजावर, रमेश वडणगेकर, सुशीला यादव, स्नेहल कांबळे, आशा बर्गे, शोभा पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘पानसरे’ स्मारक तीन महिन्यांत पूर्ण करा
By admin | Published: August 04, 2016 12:56 AM