कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात भिक्षा मागणाऱ्या आजीसोबत बागडणाºया दृष्टिहीन ‘सम्राट’च्या डोळ््यांची सोमवारी राजारामपुरीतील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. अतुल जोगळेकर यांच्याकडे प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्याचा एक डोळा पूर्णत: निकामी झाला असून एका डोळ््याने दिसू शकेल अशी शक्यता तपासण्यानंतर व्यक्त झाली. त्यास दृष्टी यावी यासाठी भाजप कार्यकर्ते व मुख्यमंत्री साहाय्यता निधी कोल्हापूरचे समन्वयक विजय जाधव हे प्रयत्न करत आहेत.मंगल पोळ व तिचा दृष्टिहीन नातू सम्राट यांची व्यथा ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात मांडली. ती वाचून समाजातील संवेदनशील मनाच्या अनेक व्यक्तींच्या हृदयाला पाझर फुटला. दातृत्वाचे अनेक हात पुढे सरसावले. केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याच्या कारणास्तव वैद्यकीय उपचाराचे मार्ग बंद झालेल्या सम्राटला दृष्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने या सम्राटवर तज्ज्ञ नेत्रोपचाराकडून उपचार करण्याच्या सूचना दिल्या. हैदराबाद, चेन्नई येथील अत्याधुनिक हॉस्पिटलमध्येसुद्धा उपचार करावे लागले तर ते करू, त्याचा खर्चही आपण स्वत: उचलण्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जोगळेकर यांच्या रुग्णालयात ‘सम्राट’च्या तपासण्या केल्या. त्यावेळी सम्राटसोबत त्याची आजी व वडील होते.नेत्ररुग्णालयात डॉ. अतुल जोगळेकर हे सम्राटच्या डोळ्यांची प्राथमिक तपासणी करताना त्यांना तो तपासणीसाठी प्रतिसाद देत होता. काही वेळ नेत्राच्या वेगवेगळ्या तपासण्याअंती डोळ्यांचे स्कॅनिंग बाहेरील सेंटरमधून करून घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. त्यानुसार जाधव यांनी पैशांची व्यवस्था करून सम्राटच्या डोळ्यांचे सायंकाळी खासगी सेंटरमध्ये स्कॅनिंग केले; पण अहवाल रात्री उशिरापर्यंत आला नव्हता. तो अहवाल आल्यानंतरच पुढील उपचारांबाबत निर्णय घेता येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.रुग्णालयातही अनेकजण गहिवरलेरुग्णालयातील इतर रुग्ण अथवा त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांनी ‘सम्राट’ला पाहताच त्यांच्याही कुतूहलचा विषय ठरला. सम्राटची अवस्था पाहून आलेले अनेकजण गहिवरले. त्यांनी ‘सम्राट’बाबत आस्थेने विचारपूसही केली, काहींनी सम्राटला कडेवर घेऊन त्याची मायाही केली.‘सम्राट’च्या उजव्या डोळ्याची जन्मताच कमी वाढ झाली आहे. त्यामुळे त्या डोळ्यातील दोष वाढल्याने तो पूर्णत: निकामा झाला आहे. डाव्या डोळ्यातील पडद्यालाही आतील बाजूने सूज आहे, त्यावर उपचार होण्याची शक्यता आहे, पण त्याबाबत आज, मंगळवारी स्कॅनिंग अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेता येतील.- डॉ. अतुल जोगळेकर, ज्येष्ठ नेत्रोपचारतज्ज्ञ, कोल्हापूर
‘सम्राट’चा एक डोळा वाचविण्यासाठी धडपड प्राथमिक तपासणी पूर्ण : स्कॅनिंगनंतर पुढील उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:55 AM