कोल्हापूर, दि. २७ : येथील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या शाहू समाधिस्थळावरील ‘मेघडंबरी’ची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. सुमारे अडीच टन तांब्यापासून तयार केल्या जाणाऱ्या या मेघडंबरीची प्रतिकृती अतिशय देखणी आणि सुबक झाली असल्याने महापौर हसिना फरास यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले. २५ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करून द्यावे, अशी सूचना यावेळी ठेकेदार,आर्किटेक्ट व शिल्पकार यांनी केली.
कोल्हापूर संस्थानात पुरोगामी विचारांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून राजर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण देशाला दिशा दिली, अशा या महान राजाची समाधी बांधली गेली नव्हती. दस्तुरखुद्द शाहू महाराज यांनीच आपली समाधी नर्सरी बागेत बांधली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती; परंतु त्याकडे शाहूप्रेमींचे फारसे लक्ष गेले नाही.
काही इतिहास संशोधकांनी ही बाब समाजासमोर आणून त्याला वाचा फोडली होती. महानगरपालिकेचे तत्कालीन स्थायी सभापती आदील फरास यांनी ही बाब मनावर घेतली आणि तत्काळ समाधिस्थळासाठी ७० लाखांची तरतूद केली. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या काळात भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली.
डिसेंबर २०१५ पासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊन आजघडीला समाधिस्थळावरील दगडी चबुतऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मेघडंबरीचे काम प्रगतिपथावर आहे. शिल्पकार किशोर पुरेकर यांनी मेघडंबरी करण्याचे काम घेतले असून, बुधवारी प्रतिकृतीची प्रत्यक्ष जागेवर चाचणी घेण्यात आली.
फायबरपासून बनविलेली प्रतिकृती क्रेनच्या सहायाने समाधिस्थळावरील चबुतऱ्यावर बसविण्यात आली. प्रतिकृतीच्या मापाप्रमाणे जागेवर व्यवस्थित बसली. त्यामुळे त्याची जागा निश्चित केली गेली. आता दोन दिवसांत मेघडंबरीचे ओतकाम सुरू होईल.
सुमारे अडीच टन तांबे त्यासाठी वापरले जाणार आहे. ओतकाम आणि फिनिशिंगची कामे २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. रात्रंदिवस हे काम सुरू राहील, असे शिल्पकार पुरेकर यांनी सांगितले.चार कोटींचा निधी आवश्यकसमाधिस्थळाचे बांधकाम तसेच मेघडंबरीच्या कामाला प्रत्यक्षात एक कोटी तीन लाख रुपये खर्च येणार आहे. तर तिन्ही बाजूनी उभारण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीला एक कोटी वीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत ७० लाख व ५० लाख असे एक कोटी २० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
उर्वरित निधी यावर्षीच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील ही कामे पूर्ण झाल्यानंतर समाधिस्थळाच्या समोरील भागात असलेल्या उद्यानाभोवतीची संरक्षण भिंत, सिद्धार्थनगरला लागून असलेला सांस्कृतिक हॉल, लॅन्ड स्केपिंग, असे काम करण्यात येणार आहे.
ऐतिहासिक वाटावा असे सांस्कृतिक हॉलचे डिझाइॅन असून, त्यामध्ये अडीचशे लोकांची बैठक व्यवस्था, तसेच शाहूंचा जीवनपट उलगडणारे चित्रप्रदर्शन यांचा समावेश असेल. या सर्व कामांना किमान चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.मेघडंबरीची बुधवारी चाचणी घेण्यात आली.
त्यावेळी महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक शेखर कुसाळे, अफजल पिरजादे, अशोक जाधव, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, माजी नगरसेवक आदिल फरास, आर्किटेक्ट अभिजित जाधव, ठेकेदार व्ही. के. पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, आदी उपस्थित होते.