वैभववाडी : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अवघ्या सव्वा महिन्यात पूर्ण झाले असून मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनी येत्या दोन दिवसात सर्वेक्षण अहवाल कोकण रेल्वे महामंडळाला सादर करणार आहे. सुमारे १०० किलोमीटरच्या नियोजित रेल्वेमार्गात ५ बोगदे, चार स्थानके आणि तीन ते चार मोठे पूल उभारले जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील ७ गावातून रेल्वेमार्गाचा सर्व्हे गेला असून या मार्गात एखादे स्थानक तालुक्यात होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.वैभववाडी कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या कित्येक वर्षांच्या मागणीला सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर गती मिळाली असून त्यांच्या सूचनेनुसार कोकण रेल्वे महामंडळाने या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनीला दिले. या कंपनीने ४ मे रोजी वैभववाडी स्थानकातून रेल्वेमार्गाच्या सर्व्हेला प्रारंभ केला होता. डोंगरदऱ्यांच्या जंगलभागातून कंपनीच्या १० ते १५ कर्मचाऱ्यांनी गुगल मॅपच्या आधारे अत्याधुनिक यंत्राद्वारे खडतर परिश्रम घेऊन सुमारे ४२ दिवसांत हा सर्व्हे पूर्ण केला आहे. आता शासन स्तरावर त्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)...असा आहे सर्व्हेजे. पी. इंजिनिअरिंग कंपनीने केलेल्या वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या सर्व्हेची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यानुसार १०० किलोमीटर अंतराचा हा मार्ग असणार आहे. वैभववाडी रोड (नापणे) रेल्वे स्थानकातून सुरु झालेला रेल्वे मार्गाचा सर्व्हे सोनाळी, कुसूर, उंबर्डे, मांगवली, उपळे, मौदे, सैतवडे, भूतलवाडी, खोकुर्ले, कळे कोपार्डे, भुये, कसबा बावडा रेल्वेगुड्स मार्केट यार्ड असा करण्यात आला आहे.बोगदे, पूल आणि स्थानकहीडोंगरदऱ्यांतील जंगलमय प्रदेशातून पूर्ण झालेल्या सर्व्हेनुसार १०० किलोमीटरच्या रेल्वे मार्गात पाच बोगदे, चार मोठे पूल आणि किमान चार स्थानके उभारावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातील एखादे स्थानक वैभववाडी तालुक्यात असेल असेही संकेत मिळाले आहेत. हा सर्व्हे तालुक्यातील ७ गावातून गेला आहे. रेल्वेमंत्रालयाने तो स्वीकारल्यास तालुक्याचे भाग्य फळफळणार आहे.बंदरेही जोडली जाण्याची शक्यताजे. पी. इंजिनिअरिंग कंपनी सर्वेक्षणाचा अहवाल येत्या दोन दिवसात कोकण रेल्वे महामंडळाला सादर करणार असून रेल्वे मंत्रालय त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे. या सर्व्हेनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी हाच सर्वोत्तम रेल्वेमार्ग ठरणार आहे.भविष्यात रेल्वेने बंदरे जोडली जावून कोकणचा हापूस, मत्स्य व्यवसायाला सुवर्णकाळ येण्यास मदत होणार आहे.
रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण
By admin | Published: June 17, 2015 11:59 PM