कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडण्याकरिता बांधण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे काम उत्तम आणि मुदतीमध्ये पूर्ण करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या कामाचे भूमीपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून ८ कोटी ४८ लाख ८१ हजार ९४५ रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्तही झाला आहे. त्यामधून या कामास प्रारंभ करण्यात आला.मंत्री पाटील म्हणाले की, विद्यापीठाच्या दोन्ही बाजू भुयारी मार्गाने जोडण्याची मागणी होती. माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यास मान्यता दिली. आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून निधीची तरतूद केल्याने हे काम गतीने पूर्ण होईल. काम दर्जेदार करावे तसेच कार्यपूर्तीनंतर विद्यापीठानेही त्याची देखभाल व्यवस्थितरित्या करावी.
शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
By पोपट केशव पवार | Published: February 03, 2024 5:30 PM