कोल्हापूर : विखुरलेल्या न्यायालयांमुळे वकिलांसह पक्षकारांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने, तसेच सर्व न्यायालये एकाच छताखाली यावीत, यासाठी विधी व न्याय खात्याच्यावतीने कसबा बावडा येथे सहामजली न्यायसंकु ल बांधण्यात आले आहे. या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून, संकुलातील अंतर्गत सजावटीची कामे सुरू आहेत. रस्ते, फर्निचर, पार्किंग व्यवस्था, आदी कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. मार्च महिन्याच्या आर्थिक वर्षाअखेरीपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांनी दिली. न्यायसंकुलाचे काम ९० टक्केपूर्ण झाले आहे. अंतर्गत सजावटीची फक्त १० टक्के कामे अपुरी होती. त्या कामांसाठी लागणारा २४ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. मंजूर निधीतून एक कोटीची अग्निशमनाची अत्यावश्यक सुविधा बसविण्यात येणार आहे. संकुलांतर्गत रस्ते, बाग, विद्युत पथदिवे, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ, रेन हार्वेस्टिंग प्लॅन, कँटिन, वकिलांसह पक्षकारांना बसण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था अशी ‘एकाच छताखाली’ ४३ दिवाणी व फौजदारी न्यायालये असणाऱ्या वैभवशाली न्यायसंकुलाची कामे या निधीतून साकारण्यात येत आहेत. मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून रस्ते, फर्निचर व पार्किंगची कामे अद्याप अपुरी आहेत. त्यासंदर्भात निविदा काढली असून, लवकरच ही कामे पूर्ण होतील. मार्चच्या आर्थिक वर्षाअखेरीस संकुलाची सर्व कामे पूर्ण होतील, असे बामणे यांनी सांगितले.
न्यायसंकुलाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण
By admin | Published: October 29, 2014 12:57 AM