कोल्हापूर : लाईन बझार व बापट कॅम्प येथील सांडपाणी उपसा केंद्राची कामे ठेकेदाराकडून मुदतीत करून घ्या आणि तेथील सांडपाणी हे प्रक्रिया केंद्राकडे वळवा, अशा सक्त सूचना गुरुवारी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय हरित लवादाने केलेला दंड आणि आणि परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याच्या दिलेल्या आदेशाची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी सुट्टीदिवशीही फिरती करून पंचगंगा प्रदूषणासंदर्भात आढावा घेतला.आयुक्त कलशेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, अभियंता गायकवाड, आदी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचगंगेचे प्रदूषण रोखण्याबाबत महानगरपालिकेने हाती घेतलेल्या कामांची पाहणी केली. बापट कॅम्प व लाईन बझार येथे बांधण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तेथील कामे नेमक्या कोणत्या टप्प्यात आहेत याची माहिती घेतली.
दोन्ही केंद्रांतील सिव्हिल कामे पूर्ण झाली असून, केवळ पंपिंग मशिनरी उभी केलेली नाही. ती का बसविली नाही, अशी विचारणा आयुक्तांनी केली. त्यावेळी पंपिंग मशिनरी जोडण्याचे काम लवकरच सुरू होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत ही कामे मुदतीत पूर्ण करून घ्या आणि प्रक्रिया केंद्राकडे सांडपाणी वळवा, अशा सूचना कलशेट्टी यांनी दिल्या.त्यानंतर ७५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची त्यांनी पाहणी केली. तेथे येणारे सांडपाणी, त्याचे प्रमाण, केंद्राची क्षमता, सांडपाण्यावर होणारी प्रक्रिया, पाण्यातील बीओडीचे प्रमाण, नमुने घेण्याची पद्धत, इत्यादींबाबत आयुक्तांनी सविस्तर माहिती घेतली. प्रक्रिया होणाऱ्या सांडपाण्यात ८.३४ इतक्या प्रमाणात बीओडी असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रिया केंद्राला लागून असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पालाही आयुक्तांनी भेट दिली.कदमवाडी तसेच महालक्ष्मीनगर परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार काही नगरसेवकांनी नुकतीच केली होती. या संदर्भात आयुक्तांनी स्वत: २५-३० घरांत जाऊन चौकशी केली. एकाच गल्लीत एका बाजूला पाणी मिळते आणि दुसऱ्या बाजूला पाणी मिळत नाही, अशा तक्रारी समोर आल्या. त्यावेळी आयुक्तांनी हा काय प्रकार आहे, याचा शोध घ्यावा आणि पाणीपुरवठ्यात सुरळीतपणा आणावा, अशी सूचना केली.