कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत समाधिस्थळावर उभारल्या जाणाऱ्या मेघडंबरीचे काम पूर्ण करा, अशा सक्त सूचना महापौर शोभा बोंद्रे यांनी महापालिकेचे अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार, आर्किटेक्ट यांना दिल्या. यापुढे कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी महापौर बोंद्रे यांच्यासह उपमहापौर महेश सावंत यांनी दिला.गेली अडीच वर्षे नर्सरी बागेतील खुल्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारले जात आहे. त्यासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात विशेष तरतुदही केली आहे; परंतु अडीच वर्षांनंतरही हे काम रेंगाळले असून, ते कधी पूर्ण होणार याबाबत साशंकता आहे. त्यामुळे महापौर शोभा बोंद्रे यांनी समाधिस्थळावरच बैठक आयोजित केली होती.
आता ती ब्रॉँझपासून बनविली जात आहे. तिच्या नक्षीदार कामास विलंब होत आहे. ठेकेदाराने हा खुलासा केल्यावर महापौर बोंद्रे यांनी शिल्पकार किशोर पुरेकर यांच्या बापट कॅम्प येथील कार्यशाळेत जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वजण तेथे गेले.मेघडंबरीचे काम अधिक कलाकुसरीचे असल्याने ओतीव काम, फिनिशिंगचे काम अतिशय किचकट व वेळखाऊ असल्याने विलंब होत आहे. तरीही बरेच काम पूर्ण झाले आहे. अजून एक-दीड महिना तरी या कामास लागतील, असे शिल्पकार पुरेकर यांनी सांगितले. पाहणीनंतर कामास का विलंब होत आहे, हे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. शेवटी महापौर बोंद्रे यांनी १५ आॅगस्टपर्यंत काम पूर्ण करा, अशी सूचना केली.
इटलीनंतर कोल्हापुरातचराजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधिस्थळावर उभारण्यात येत असलेली ब्रॉँझची मेघडंबरी ही इटलीनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात तयार केली जात आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराज यांची एक समाधी इटलीमधील फॉरेन्सिक शहरात आहे.
राजाराम महाराज यांचे निधन इटलीमध्ये झाले. त्यांच्या स्मरणार्थ राजर्षी शाहू महाराज यांनी तेथे मेघडंबरी उभी केली आहे. तशी हुबेहुब मेघडंबरी कोल्हापुरातील समाधिस्थळावर उभारली जात आहे. तिचे खांब हे भवानी मंडपातील खांबासारखे आहेत. आतापर्यंत तीन टन ब्रॉँझ त्यासाठी वापरण्यात आले आहे.
बैठकीतील निर्णय -
- - येत्या आठ दिवसांत संरक्षक भिंतीचे काम सुरू करणार.
- - लॅँडस्केपिंग व फरशी बसविण्याचे कामही सुरू करणार.
- - मेघडंबरीचे काम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करणार.
- - त्यानंतर पुढील दहा दिवस प्रत्यक्ष समाधिस्थळी बसविणार.
- - सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात समाधिस्थळाचे लोकार्पण.