कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन अंतर्गत धरण क्षेत्रात करण्यात येणारी सर्व प्रकारची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत, त्यासाठी कामाचे नियोजनबद्ध स्वरूप निश्चित करावे, अशी सूचना बुधवारी आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली. घरफाळा, मनपा दुकानगाळे यापासून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
कोल्हापूर महानगरपालिकेतील विविध कामांच्या आढावा बैठकीत आमदार पाटील यांनी या सूचना केल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. ताराबाई गार्डन येथील कार्यालयात ही बैठक झाली.
थेट पाईपलाईन योजनेतील उपसा केंद्र, जॅकवेल, इलेक्ट्रीफिकेशन, विद्युत टॉवर उभारणी, इत्यादी कामे जानेवारीत पाणी कमी झाले की तातडीने सुरू करावीत आणि पावसाळ्यापूर्वी संपविण्यात यावीत यादृष्टीने नियोजन करण्याचा निर्णय बैठकीत झाला. सोळांकूर, ठिकपुर्ली येथील पाईपलाईन टाकण्यात अडथळा आला असला तरी तो चर्चेतून सोडविला जाईल. योजनेवर नियंत्रण ठेवण्याकरिता एक स्वतंत्र अधिकारी तसेच अन्य अभियंते भरतीबाबत आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
महानगरपालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे, विकासकामांना निधी उपलब्ध झाला पाहिजे, यादृष्टीनेही बैठकीत चर्चा झाली. घरफाळ्यात बरीच गळती आहे. ज्या मिळकतींना घरफाळा आकारला गेला नाही, त्यांच्यावर कराची आकारणी करावी. मनपाचे दुकानगाळ्यांच्या भाड्याचा विषय सामंजस्याने मिटवून योग्य आकारणी करावी, अशी सूचना चर्चेतून पुढे आली. नवीन सर्वेक्षणातून ‘सी’ व ‘डी’ वॉर्डातील ३० हजार मिळकतींपैकी ४०० मिळकतींना घरफाळा आकारला जात नव्हता, ही बाब उघड झाली. त्यामुळे त्यांना तो आकारला जाईल, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.‘महिन्यातून एकदा ‘बस डे’चा विचारकेएमटी’ची आर्थिक घडी बसविण्यासाठी काही उपाययोजना करण्यावर चर्चा झाली. भाडेवाढ करता येईल का, तोट्यातील मार्ग बंद करता येतील का, यासह प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘बस डे’सारखा उपक्रम राबविता येईल का, या अनुषंगाने सूचना झाल्या. बस डे हा उपक्रम राबविण्यावर सर्वांचीच सहमती झाली.महापौर आयुक्तांवर भडकल्या
गेल्या काही दिवसांपासून आयुक्त चौधरी यांची वर्तणूक चुकीची असल्याचा समज महापौर फरास यांचा झाला आहे. महापौर म्हणून फोन केला तरी ते घेत नाहीत. बैठकीला बोलविले तर येण्याचे टाळतात, असा आक्षेप महापौरांनी बैठकीत घेतला. ‘तुम्हाला कोणी डोस दिला आहे का? आमच्या स्वनिधीतील कामे करण्यासाठीही तुम्ही कशासाठी आढेवेढे घेता’ अशा शब्दांत महापौरांनी आयुक्तांवर आपला राग व्यक्त केला. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याकरिता वेळ मागण्यासाठी आपण फोन करीत असतानाही आयुक्तांनी घेतला नाही, अशी तक्रारच आमदार पाटील यांच्यासमोर केली. शहर सौंदर्यीकरणासाठी खुले आवाहनशहर सौंदर्यीकरणासाठी केएसबीच्या धर्तीवर शहरातील अनेक उद्योजक, कंपन्या, शैक्षणिक संस्था तयार असल्याने या सर्वांना आवाहन करून त्यांचा सहभाग करून घेण्याचा निर्णय यावेळी झाला. त्यासाठी नियम, अटी तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.बैठकीत झालेले अन्य निर्णयसावित्रीबाई फुले रुग्णालयात आयसीयू सुविधा देणारब्लड कंपोनंटसाठी डीपीटीसीतून ६० लाख मागणार.शहरातील डॉक्टर मानसेवी म्हणून घेणार.अतिक्रमण हटाव मोहिमेची यादी नगरसेवकांना देणार.बेकायदेशीरकेबीन, हातगाड्या जप्त करणार.