कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील १८२३ प्राध्यापकांची सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित ६२२ प्राध्यापकांच्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम सध्या सुरू आहे. वेतननिश्चितीसाठी पैशांची मागणी होत असल्याची एकही लेखी तक्रार माझ्याकडे आलेली नाही, असे कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी सांगितले.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांत एकूण २४४५ प्राध्यापक आहेत. त्यापैकी १८२३ प्राध्यापकांची सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आक्षेपित असणाऱ्या उर्वरित ६२२ प्राध्यापकांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी गुरुवारपासून शिबिर आयोजित केले आहे.वेतननिश्चितीबाबत प्रशासन अधिकारी जे आक्षेप नोंदवितात. त्याबाबत महाविद्यालय प्रतिनिधी, प्राचार्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो. या पद्धतीने वेतननिश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. फिडर-केडर, उद्बोधन आणि उजाळा वर्ग पूर्ण केले नसणे, आदी स्वरूपातील त्रुटी अधिक आहेत.
पुढील आठवड्यातील अखेरच्या दिवसापर्यंत कोल्हापूर विभागातील सर्व प्राध्यापकांच्या कागदपत्रांच्या तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ज्या प्राध्यापकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील, तर त्याची पूर्तता करून ते फेरसादर करण्याची सूचना महाविद्यालयांना केली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या चुकीच्या वेतननिश्चितीमध्ये काही प्राध्यापकांची वसुली निघत असेल, तर पहिल्या संबंधित प्राध्यापकांना लेखी सूचना दिली जाणार आहे.
या प्राध्यापकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. वसुली असल्यास सातव्या वेतन आयोगाच्या देय फरकातून संबंधित रक्कम समायोजित करण्यात यावी, अशी सूचना शिक्षण संचालकांनी परिपत्रकाद्वारे दिली असल्याचे डॉ. साळी यांनी सांगितले.
कार्यालयातील एकाची बदलीवेतननिश्चितीसाठी शिक्षण सहसंचालक कार्यालयात आर्थिक देवघेव होत असल्याची एकाही प्राध्यापकाची लेखी तक्रार माझ्याकडे आलेली नाही. काही संघटनांनी केलेल्या तक्रारी, मांडलेल्या मुद्यानंतर कार्यालयातील एका कर्मचाºयाची त्याच्या मूळ ठिकाणी गेल्या दोन दिवसांपूर्वी बदली केली असल्याचे डॉ. साळी यांनी सांगितले.
आर्थिक गैरव्यवहाराबाबत एखादा अधिकारी अथवा कर्मचारी, जर मागणी करीत असेल, तर याबाबत तक्रार करण्याच्या शासन नियमांमध्ये सुस्पष्ट तरतुदी आहेत; त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देऊ शकता; मात्र, मोघम स्वरूपाच्या तक्रारी करू नयेत. त्याबाबतचे पत्र शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाला (सुटा) गेल्या दोन दिवसांपूर्वी दिले असल्याचे डॉ. साळी यांनी सांगितले.
स्टॅमपिंग कार्यालय नव्हेवेतननिश्चिती करताना त्रुटी काढण्यात येऊ नयेत, अशी मागणी काही संघटना करीत आहेत; मात्र शिक्षण सहसंचालक कार्यालय हे स्टॅमपिंग कार्यालय नाही; त्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करताना आवश्यक पडताळणी, कागदपत्रांची तपासणी या कार्यालयाकडून केली जाणार असे डॉ. साळी यांनी सांगितले.
विभागाची आकडेवारी दृष्टिक्षेपातजिल्हा एकूण प्राध्यापक वेतननिश्चिती झालेले प्राध्यापक आक्षेपित प्रकरणेकोल्हापूर १०४१ ६६९ ३७२सांगली ७२३ ५२९ १९६सातारा ६८० ६२५ ५४