लोकमत न्यूज नेटवर्क --महाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पुढील टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन २३ जूनला करण्यात येणार असल्याची घोषणा करीत डिसेंबर २०१८ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणारच, असा निर्धार केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दुर्घटनेनंतर केवळ १६५ दिवसांत काम पूर्ण केलेल्या नवीन सावित्री पुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यासह कोकणातील रस्ते विकासासाठी मंजूर केलेल्या ९९०० कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे कोकण विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत भविष्यात कोकण विकासाचे श्रेय नितीन गडकरी यांनाच जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, खासदार अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्री पुलाच्या दुर्घटनेची जबाबदारी सरकारचीच आहे. कमकुवत पुलाच्या दुरुस्तीबाबत त्याच वेळी कार्यवाही होणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली. भविष्यात अशा महत्त्वाच्या पुलांच्या दुरुस्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही शासनाकडून केली जात असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. पळस्पे ते इंदापूरपर्यंतच्या महामार्गाचे काम आघाडी सरकारच्या काळापासून रखडले होते. मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे कोकणवासीयांचा आत्मा आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या कामात भूसंपादनाच्या अडचणी निर्माण होत असल्याने कामाला विलंब होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या ६०-६५ वर्षांत जितक्या किलोमीटरचे रस्ते बांधले गेले, त्यापेक्षाही अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते गेल्या तीन वर्षांच्या काळात नितीन गडकरी यांच्या विभागाने पूर्णत्वास नेले आहेत. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर विधानसभेत निवेदन करताना पावसाळ्यापूर्वी जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा त्यावेळी नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार मी केली होती. त्याच्या प्रत्यक्ष वचनपूर्तीचे समाधान झाल्याचे सांगत, या दुर्घटनेत बळी पडलेल्या प्रवाशांना हीच खरी श्रद्धांजली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांनाच दिले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सांगितले. पूर्वी कधीच दिला नव्हता इतका अधिक निधी नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विकासासाठी दिला. त्याबद्दल गीते यांनी दोघांना धन्यवाद दिले. सावित्री पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्याचा उल्लेखही गडकरी यांनी यावेळी केला.सावित्री पुलाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी दुर्घटनेनंतर मदतकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांसह शासकीय अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, प्रधान सचिव आशिष कुमार, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हाधिकारी मलिकनेर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावेकेवळ कोकणातील सुमारे ६६० कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी ९९०० कोटी रुपयांच्या तीन पॅकेजेसना सरकारने मंजुरी दिली आहे. कोकणाचे भाग्य बदलण्याची ताकद या महामार्गामध्ये असल्याने कामातील अडथळे दूर करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. सरकारकडून येत्या तीन महिन्यांत महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.
चौपदरीकरण दीड वर्षात पूर्ण करणार
By admin | Published: June 06, 2017 12:11 AM