कोल्हापूर : कोरोना काळातही सीपीआरच्या कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्यावतीने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वासंती पाटील, डॉ. मिलिंद सामानगडकर यांनी या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. त्यांना भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. उल्हास मिसाळ आणि भूलतज्ज्ञांचे सहकार्य लाभले. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापुरातील समीक्षा कांबळे या दहा वर्षांच्या मुलीच्या कानातून पू आणि घाण वास येत होता. हा आजार कानातील हाडांच्या साखळीत आणि मेंदूच्या भागात पसरला होता. तिला नोव्हेंबरमध्ये सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. आठवड्याभरातच तिच्यावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली.
डिसेंबर २०२० मध्ये उचगाव येथील भारत घाटे यांनाही कानात दुखत असल्याने दाखल करण्यात आले. कानातून रक्तमिश्रित पाणी येत होते. या रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तपासणीनंतर त्यांच्या कानातील हाडांची साखळी सडल्याचे आढळले. त्यामुळे त्यांचा चेहराही वाकडा झाला होता. त्यांच्यावरही अवघड शस्त्रक्रिया करून हा आजार बरा करण्यात आला.
जानेवारीमध्ये राधानगरी तालुक्यातील कासारवाडा येथील धनाजी पवार हे आवाजात बदल जाणवत असल्याने दाखविण्यासाठी आले होते. त्यांच्या डाव्या स्वरतारेवर गाठ असल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. त्यांच्यावर ९ जानेवारीला मायक्रोलॅरीगोस्कीप शस्त्रक्रिया करून ही गाठ काढण्यात आली.
चौकट
लहान बाळावर शस्त्रक्रिया
वसगडे येथील स्वरारी माने या ४ महिन्यांच्या बाळाला मानेच्या डाव्या बाजूला सूज, ताप आणि दुखण्याचा त्रास होता. यावेळी तपासणी केली असता, कानाखाली पू झाल्याचे निष्पन्न झाले. कानाच्या मागच्या बाजूला छोट्या शस्त्रक्रियेद्वारे चीर काढून हा पू बाहेर काढण्यात आला.
०४०२२०२१ कोल ऑपरेशन ०१
०४०२२०२१ कोल ऑपरेशन ०२
०४०२२०२१ कोल डॉ. अजित लोकरे
चार महिन्यांच्या बाळाच्या कानामागील भाग सुजल्याचे पहिल्या छायाचित्रात दिसत आहे. याच ठिकाणी शस्त्रक्रिया करून पू बाहेर काढण्यात आला.