कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार ‘सीटीएस’ धनादेश आज, मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. चलनांचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना देत प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. जिल्हा बॅँकेकडून सुविधा मिळत नाहीत, म्हणून मार्चपासून जिल्हा परिषद प्रशासनाने व्यवहार बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. कामकाजात सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जिल्हा परिषदेने व्यवहार नियमित ठेवण्याचा निर्णय घेतला; पण पुन्हा अपेक्षित सुविधांची पूर्तता करण्यास बॅँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने जिल्हा परिषदेने बॅँकेला खरमरीत पत्र लिहून इशारा दिला होता. रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार ‘सीटीएस’ धनादेश वापरणे बंधनकारक आहे. बॅँकेकडून अशी धनादेश पुस्तके दिली जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत ‘लोकमत’ने आज, मंगळवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बॅँकेच्या पातळीवर एकच खळबळ उडाली. बॅँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकाळी आठ वाजता बोलावून घेत चांगलीच खरडपट्टी काढली. जिल्हा परिषद शाखेचा आढावा घेतला. ‘सीटीएस’ धनादेशाबाबत जिल्हा परिषदेने केलेली मागणी व त्यावरील कार्यवाही याची माहिती प्रशासक चव्हाण यांनी घेतली. तत्काळ ‘सीटीएस’ धनादेशाची दहा पुस्तके जिल्हा परिषदेला देण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी केल्या.
जिल्हा बँकेकडून ‘सीटीएस’ची पूर्तता--लोकमत इफेक्ट
By admin | Published: July 23, 2014 12:18 AM