कोल्हापूर : वीज दरवाढीविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी शुक्रवारी पुकारलेल्या ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. विविध उद्योजकीय संघटनांनी गेल्या पाच दिवसांपूर्वी ‘बंद’साठी आवाहन करूनदेखील शिरोली, गोकुळ शिरगांव, शिवाजी उद्यमनगर, औद्योगिक वसाहतींमधील काही उद्योगांतील यंत्रांची धडधड सुरूच होती.वीज दरवाढीविरोधात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीने आंदोलनाचा कार्यक्रम ठरविला आहे. त्यात कार्यक्रमानुसार मोर्चा, वीज बिलांची होळी या आंदोलनाचे नियोजन केले होते. हे आंदोलन करण्याच्या निर्णयासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या (केईए) सभागृहात उद्योजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात त्यांनी ‘उद्योग बंद’ ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या बैठकीस उपस्थित असणाऱ्या उद्योजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांना या ‘बंद’ची माहिती दिली होती. मात्र, शिरोली, गोकुळ शिरगांव, शिवाजी उद्यमनगर, कागल पंचतारांकित, औद्योगिक वसाहतींमधील काही उद्योग, मशीन शॉपमधील कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते, तर काही उद्योजक बंद पाळून या आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
उद्योजकांच्या ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: February 28, 2015 12:17 AM