कोल्हापूर/शिरोली : देशव्यापी संपाला बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) कामगारांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. मंदीचा परिणाम त्यांच्या संपातील सहभागावर झाला. शिरोली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिवाजी उद्यमनगरमधील कारखाने, कंपन्यांमधील कामे सुरू राहिली. विविध संघटना, संस्था, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असणारे काही कामगार संपामध्ये सहभागी झाले.जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांकरिता अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने हा संप पुकारला आहे. त्यात कामगारविषयक धोरणांमध्ये बदल करावा, यासह अन्य मागण्या घेऊन औद्योगिक वसाहतींमधील असंघटित कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाने केले होते. त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक कामगारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.
गेल्या सहा महिन्यांपासून औद्योगिक वसाहतींमध्ये मंदीचे वारे वाहत आहे. अनेक कंपन्यांनी शिफ्ट कमी केली आहेत. बहुतांश जणांनी चार ते पाच दिवसांचा आठवडा केला आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी, काम मिळेल त्या दिवशी करण्यावर अनेकांचा भर आहे, अशी स्थिती असल्याने अधिकतर कामगारांनी संपामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला; त्यामुळे शहरातील शिवाजी उद्यमनगर आणि जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील कारखाने, कंपन्यांमधील कामे सुरू राहिली.