जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले असतानाही जवळपास ७० टक्के व्यवहार सुरळीत सुरू आहेत. ब्रेक द चेनचा आदेश काढला असलातरी नागरिकांची गर्दी हटत नसल्याने कोरोनाला आणखी आमंत्रण दिल्यासारखेच आहे.
जयसिंगपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ५० वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव सुरू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. मात्र, हे लॉकडाऊन नावालाच राहिले आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक दुकाने सर्रासपणे सुरू आहेत. जयसिंगपूर पालिकेने शासनाच्या निर्बंधानुसार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंदचे आवाहन केले आहे. मात्र, बाजारपेठेतील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. बंदला व्यापाऱ्यांचा विरोध कायम आहे. जमावबंदीचा आदेश असलातरी अनेकजण चौकाचौकात गर्दी करताना दिसून येत आहे. प्रशासन पातळीवर कोरोना सेंटर सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. तरीदेखील शहरासह ग्रामीण भागात बेफिकीरपणा दिसून येत आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही बाजारपेठेत दिसून येते. अशीच परिस्थिती राहिली तर कोरोना कसा नियंत्रणात येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
----------------------------
चौकट -
दुकाने बंदसाठी पोलीस रस्त्यावर
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंदचे आदेश असतानाही बाजारपेठेत नेहमीप्रमाणे वर्दळ असल्याचे दिसून आले. दुसरीकडे मिनी लॉकडाऊनला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, शुक्रवारी पोलीस आल्याचे पाहताच अनेकांनी दुकाने बंद केली. काही ठिकाणी दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. त्यामुळे अनेकांची धावपळ उडाली होती.
फोटो - ०९०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील क्रांती चौकात अशाप्रकारे नागरिकांची गर्दी कायम आहे.