लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर मंगळवारपासून विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. १६ दुबार ठरावांच्या सुनावणीदरम्यान १० ठरावधारकांनी तडजोड करीत हरकत मागे घेतली. इतर सहा दुबार ठरावांधारकांचे म्हणणे ऐकून घेतले.
‘गोकुळ’च्या प्रारूप यादीवर ७६ हरकती दुग्ध विभागाकडे आल्या होत्या. त्यातील ३५ हरकती या दुबार ठराव होते. यातील करवीर, कागल, हातकणंगले, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांतील १६ दुबार ठरावधारक संस्थांना नोटिसा काढून विभागीय उपनिबंधक (दुग्ध) शिरापूरकर यांनी मंगळवारी म्हणणे मांडण्यास सांगितले. त्याप्रमाणे सहा ठरावधारकांनी वकिलांमार्फत आपली बाजू मांडली. १० ठरावधारकांनी आपापसांत समझोता केला. आज, बुधवारी आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड व राधानगरीतील १९ दुबार ठरावांवर सुनावणी होत आहे. उद्या, गुरुवारी उर्वरित ४१ हरकतींवर सुनावणी होणार असून, यामध्ये यादीत नाव नाही, प्रतिनिधींच्या नावात बदल करणे, आदी स्वरूपाच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ५ ते ७ मार्च या कालावधीत निकाल तयार करून ८ मार्चला हरकतीवर निकाल दिला जाणार आहे. १२ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २० दिवसांत म्हणजे २३ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊ शकते.
हरकतींवर ग्रामपंचायत निवडणुकीचे पडसाद
जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. यावेळी स्थानिक पातळीवर पारंपरिक विरोधी गटात समझोता झालेला आहे. त्याचे पडसाद हरकतीवर उमटले असून त्यातूनच सुनावणीदरम्यान तडजोडी दिसत होत्या.
कोट-
‘गोकुळ’च्या प्रारूप यादीवर हरकतींची सुनावणी सुरू झाली आहे. तीन दिवस सुनावणी घेऊन ८ मार्चला यावर निकाल देणार आहे.
- सुनील शिरापूरकर (विभागीय उपनिबंधक, दुग्ध, पुणे)