कोल्हापूर : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचे कामकाज सोमवारपासून ठप्प झाले आहे. संगणक परिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच आता ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवकही आंदोलनात उतरले आहेत. त्याला अखिल भारतीय सरपंच परिषदेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गावगाड्याच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. या सर्वांनी एकत्र येत सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी केली.गेले काही दिवस संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. त्याला आता सरपंच परिषत, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. या सर्व संघटनांच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेसमोरील निदर्शनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले. यातील सर्व मागण्या या राज्य शासनाच्या पातळीवरील असल्यामुळे आजच या मागण्या शासनाकडे पाठवत असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक सेवा बंद राहता कामा नयेत अशा सुचना पाटील यांनी सरपंचांना दिल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचे काम ठप्प, कर्मचाऱ्यांच्या संपाला सरपंचांचाही पाठिंबा
By समीर देशपांडे | Published: December 18, 2023 4:28 PM