दीपक जाधव, कोल्हापूर: वाडी रत्नागिरी (ता.पन्हाळा ) येथील दख्खनचा राजा जोतिबाच्या श्रावण षष्ठी यात्रेची सांगता बुधवारी सकाळी धुपारतीने झाली. सकाळी ७ वाजता धुपारती मंदीर प्रदक्षिणेसाठी मुख्य पुजारी देवाच्या सेवकासह लवाजम्यासह बाहेर पडली. जोतिबा व चोपडाई देवीचा गजर करत भाविकांनी मंदीर परीसर दुमदुमून सोडला. धुपारतीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी धुपारतीचे दर्शन घेतले. अंगारा वाटपानंतर धुपारती सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्यासाठी परगावाहून आलेल्या भाविकांनी पुरणपोळीच्या नैवेद्याने पुजाऱ्याच्या घरी उपवास सोडला. देवाचा लिंबू नारळ घेऊन भाविकांनी डोंगर उतरला. या यात्रेसाठी पुणे,मुंबई, लातूर, सातारा,,कऱ्हाड सांगली आदी ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने आले होते.
श्रावण षष्ठी यात्रेचे महत्व.
चैत्र यात्रे नंतर जोतिबा डोंगरावर महत्वाची व मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठी यात्रा याला आध्यात्मिक व पौराणिक आधार असून श्रावण षष्ठी या दिवशी केदारनाथाच्या मार्गदर्शनाखाली चिरपट अंबा चोपडाईने रत्नासुराचा वध केला त्याच्या रक्ताने देवी न्हाऊन गेली.त्यामुळे देवीच्या अंगाचा दाह होऊ लागला.त्यामुळे देवीला विराट रूपातून मुळ रुपात येता येईना म्हणून हा दाह कमी करण्यासाठी रात्रभर लिंबु, बेल व दुर्वानी पुजा केली.सूर्योदया वेळेस दाह कमी होऊन देवी मुळ रुपात आली.म्हणून या दिवशी संपूर्ण रात्रभर देवीला वस्त्र न वापरता देवीची पुजा ही लिंबु, बेल,दुर्वा आदी वापरुन विषेश पुजा केली जाते.तो दिवस म्हणजे षष्ठी.नेटके नियोजन पण भाविकांची गैरसोय.
श्रावण षष्ठी यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र या वर्षीच्या यात्रेत भाविकांची गर्दी गत वर्ष्याच्या तुलनेत कमी होती. डोंगरावर येणारा भाविक हा मुख्य धुपारती सोहळ्यासाठी येत असतो.पण पोलीस प्रशासनाने धुपारती येण्याआधी खबरदारी म्हणून अर्धातास आधी मंदिराचे सर्व दरवाजे बंद केल्यामुळे मंदीर परिसरात भाविकांची संख्या कमी होती. पश्चिम, दक्षिण व उत्तर दरवाज्यावर भाविकांना थांबवून ठेवल्या मुळे भाविकांची गैरसोय झाली.