कोल्हापूर : ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची आज, बुधवारी सांगता होत आहे. सकाळी दहा वाजता धैर्यप्रसाद हॉलमध्ये होणाऱ्या समारंभात, कोरोना कालावधीत उत्कृष्ट सेवा बजावलेले चालक, कर्मचारी यांचा सत्कार होणार आहे. दि. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत पोलीस दल व प्रादेशिक परिवहन विभागातर्फे हे अभियान करण्यात आले होते.
अभियानाच्या महिन्याभरात रिक्षाचालकांची नेत्रतपासणी, हेल्मेट वापर, सीटबेल्टबाबत जनजागृती, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना गांधीगिरीने समज, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांतून विद्यार्थ्यांमध्येही वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले. सांगता समारंभात महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सत्कार होत आहे. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उपअधीक्षक जयश्री गायकवाड, आर. आर. पाटील, मंगेश चव्हाण, निरीक्षक स्नेहा गिरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस उपस्थित राहणार आहेत.