कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२०-२१ या चालू गळीत हंगामाची सांगता गुरुवारी (दि. १८) झाली. संपूर्ण हंगामात कारखाना १३२ दिवस चालला तर कारखान्याने हंगामात ४ लाख १० हजार ८८७ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याचा ‘समाप्त भोंगा’ सायंकाळी ६.३० वाजता वाजला.
‘राजाराम’च्या गळीत हंगामाची सांगता मार्चच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस होईल, अशी नोटीस कारखान्याने यापूर्वीच प्रसिद्ध केली होती. त्यामुळे कारखान्याच्या शेती विभागाची गेल्या दोन आठवड्यांपासून कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्यासाठी लगबग सुरू होती. दरम्यान, कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने ऊसतोड शेतमजूर आपल्या बैलगाड्या शुक्रवारी कारखान्याकडे जमा करणार आहेत. त्यानंतर ट्रकमधून आपले बैल व अन्य जनावरे तसेच संसारोपयोगी साहित्य भरून शेतमजूर आपल्या गावी रवाना होणार आहेत. सध्या मुकादम आणि ऊसतोड मजूर यांच्या हिशोबाच्या बैठका सुरू आहेत.