जोतिबा : जोतिबा श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची ‘चांगभलं’च्या गजरात सांगता झाली. गुरुवारी सकाळी ६.३० वाजता धुपारती सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी श्रींचे मुख्य पुजारी, देवसेवक वाजंत्रीच्या लवाजम्यासह बाहेर पडला. 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या गजराने अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला.लाखो हातांनी गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्यात आली. भाविकांच्या गर्दीने भक्तीच्या धारा ओसंडून वाहत होत्या. सकाळी ७ वाजता अंगारा वाटपाने धुपारती सोहळ्याची सांगता झाली. भाविकांनी पुजाऱ्याच्या घरी पुरणपोळी प्रसादाने षष्ठीचा उपवास सोडला. राखणीचा लिंबू-नारळ घेऊन भाविकांनी परतीचा मार्ग धरला. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे देशमुख, कोडोलीच्या सपोनि. शीतल डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शाहुवाडी पन्हाळाचे प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळाचे तहसीलदार रमेश शेंडगे, सरपंच राधा बुणे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, केदारलिंग देवस्थान कार्यालयाचे प्रभारी दीपक म्हेत्तर यांनी केलेल्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली.दर्शन रांग व्यवस्थेसाठी पोलीस मित्र, देवस्थानचे कर्मचारी, पुजारी समिती, पोलीस पाटील, सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवकं उपस्थित होते. यात्रा काळात वीज पुरवठा अखंडित सुरू होता. आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा पुरविली. आपत्कालीन सेवाही तैनात होती. जोतिबा ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा व स्वच्छता सेवा पुरविली.
Jyotiba Temple: ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा श्रावण षष्ठी यात्रेची सांगता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 1:01 PM