लोकमत न्यूज नेटवर्क, निपाणी : प्रथमाचार्य शांतिसागर महाराजांची जन्मभूमी भोजनगरीत तपोभूमी प्रणेते श्री प्रज्ञासागर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसांपासून सुरू असलेल्या आदर्श पंचकल्याण महामहोत्सवाची बुधवारी धार्मिक विधी प्रकारे सांगता करण्यात आली.
बुधवारी पहाटे मांगलवादय घोष, आशीर्वाद पाठ या कार्यक्रमाबरोबर नित्यविधी, मंगल कुंभाणयन, पंचामृत अभिषेक, शांतिधारा, लघुशांतिक व निर्वाण कल्याणक पूजा पार पडली तर प्रज्ञासागर महाराजांच्या दिव्य सानिध्यात मानस्तंभावर २४ जिनबिंब मूर्ती स्थापना व सुवर्ण कलश बसविण्यात आले. तसेच गुरू मंदिरामध्ये २४ तिर्थंकरांची जिनबिंब मूर्ती स्थापना व शांतिनाथ मंदिरामध्ये ७२० जिनबिंब मूर्तींची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मानस्तंभ शिखरावर्ती सुवर्णकलश स्थापना करण्यात आला.
गावातून विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी ६ नंतर अवगृत स्नान महाभिषेक घालण्यात आला. रात्री सातनंतर ध्वजारोहण, संगीत आरती, विसर्जन व कंकन विमोचन असे कार्यक्रम पार पडले तर महामहोत्सवात साहाय्य केलेले व परिश्रम घेतलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा आदर्श पंचकल्याण महामहोत्सव उत्साहाने व शांततेने पार पाडण्यासाठी श्री शांतिसागरमतीर्थ आदर्श पंचकल्याण महोत्सव समिती, श्री शांतिसागरम तीर्थ समिती सदस्य, समस्त दिगंबर जैन समाज, वीरसेवा दल, वीर महिला मंडळ व अन्य मान्यवर मंडळींनी परिश्रम घेतले.