अमर पाटील
कळंबा : जगातील नवदुर्गांपैकी मानाची सहावी नवदुर्गा अशी ख्याती असणाऱ्या श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील नैसर्गिक व प्राचीन वस्तूंची प्रचंड दुरवस्था झाली आहे. देखभाल, दुरुस्तीसह प्राचीन वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत नसल्याने, काळाच्या ओघात हा प्राचीन ठेवा लुप्त होणार की काय, अशी भीती आता भाविकांमधून व्यक्त होत आहे.
जयंती आणि गोमती नद्यांचे उगमस्थान येथे असून प्राचीन हेमाडपंथी विस्तीर्ण मंदिर, बारमाही वाहणारे तीन नैसर्गिक पाण्याचे कुंड, शेकडो वर्षांपूर्वीचे गर्द सावली देणारे महाकाय वृक्ष या साऱ्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.
बालिंगा गावचे ग्रामदैवत असणारे प्राचीन काळातील अकराव्या शतकात बांधण्यात आलेले हेमाडपंथी स्वरूपातील श्री कात्यायनी देवीचे मंदिर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर वसले असून मंदिरास स्थानिक नागरिकांसह परराज्यातील भाविक वर्षभर भेट देत असतात.
मात्र, मंदिर परिसरातील परशुराम मंदिराची प्रचंड दुरवस्था झाली असून मंदिराच्या भिंती जीर्ण होऊन सुटू लागल्या आहेत. मंदिर कधी कोसळेल हे सांगता येत नाही. मंदिरातील नैसर्गिक कुंडाची मोठी पडझड झाली आहे. श्री कात्यायनी देवीचे मंदिर ते परशुराम कुंडाकडे जाणाऱ्या जयंती नदीच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या लहान पुलाची दुरवस्था झाली आहे. श्री कात्यायनी देवीच्या मंदिरापुढील नैसर्गिक कुंडाच्या दगडी पायऱ्या, लोखंडी संरक्षक कठडे यांची पडझड झाल्याने दुरुस्ती गरजेची बनली आहे. मंदिराच्या पिछाडीस उगम पावणाऱ्या जयंती, गोमती नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण करून गाळ काढण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत. त्यामुळे या नद्या आहेत की नाले, हे उमजत नाही. या नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असून यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आजमितीला शासकीय निधीतून सुशोभिकरण सुरू असले तरी, यातून प्राचीन ठेवा संवर्धित व्हावा यासाठी फारसे लक्ष दिले गेले नाही.
चौकट:
सुशोभिकरण करताना भान का राहिले नाही
दोन कोटींच्या सुशोभिकरणाच्या उपलब्ध निधीतून मंदिराच्या पिछाडीवर भक्तनिवास, स्नानगृहे, शौचालय उभारण्यात आली असून त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. भविष्यात यातील पाणी झिरपून मंदिरासमोरील कुंडात येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शोषखड्डे काढून अथवा स्वतंत्र पाईपलाईन टाकून हे सांडपाणी परिसराबाहेर नेणे गरजेचे आहे.
फोटो : ०८ कात्यायनी मंदिर
श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील जयंती नदीच्या पात्रावरील लोखंडी पुलाची दुरवस्था झाली आहे.