कोल्हापूर : प्रत्येक तालुक्यातील कोरोना रुग्णांची स्थिती व रुग्णांच्या मृत्यूची कारणं शोधण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी अथवा संपर्क अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. या समितीच्या माध्यमातून डेथ ऑडिट करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.
ते म्हणाले, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देऊन संबंधितांचे स्वॅब घ्या, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात, एखाद्या शाळेत स्वॅब केंद्र सुरू करा. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आदेश काढावेत. झालेल्या चाचण्यांची डाटा एंट्री पोर्टलला नोंद केली पाहिजे.
रुग्णांच्या मृत्यूची जबाबदारी त्या रुग्णालय प्रमुखाची आहे. त्यासाठी डेथ ऑडिट झाले पाहिजे. रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी जिल्हास्तरावर प्राचार्य प्रशांत पटलवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीशी संपर्क साधून आपल्या तालुक्यातील रुग्णालयांचे ऑडिट करून घ्यावे, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, उपमुख्य कार्यकारी अधिकरी मनीषा देसाई, डॉ. उषादेवी कुंभार, आदी अधिकारी उपस्थित होते.
--
फोटो नं २८०४२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातून बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.
--