कोल्हापूर : माजी पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम याने अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा तसेच त्यांचा शस्त्रे पुरविण्यात हात असल्याचा सीबीआयचा संशय आहे. कदम याच्या विरोधात पानसरे हत्येसंबंधी काही धागेदोरे मिळतात का, त्यादृष्टीने कोल्हापूर पोलिस गोपनीय स्तरावर चौकशी करत आहेत. वेळप्रसंगी त्याचा जबाबही आम्ही नोंदवू, असे वरिष्ठ सूत्रांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल तीन वर्षांनी डॉ. वीरेंद्र तावडे याला सीबीआयने अटक केली. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयचे अधिकारी अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. तपासामध्ये माजी पोलिस उपनिरीक्षक कदम याचाही डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणातील मारेकऱ्यांशी लागेबांधे असल्याचे पुढे आल्याचे बोलले जाते. तावडेच्या ई-मेल व मोबाईल कॉल डिटेक्सवरून कदम व तावडेचा संपर्क झाल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिस पानसरे हत्येप्रकरणी डॉ. तावडेचा ताबा घेणार आहेत. सध्या तावडे सीबीआयच्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्या कोठडीची मुदत आज, सोमवारी संपत आहे. त्यामुळे त्याला तिसऱ्यांदा पूण्यातील सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूरहून एक विशेष पथक रविवारी रात्रीच रवाना झाले. डॉ. तावडे न्यायालयीन कोठडीत गेल्यास त्याचा ताबा कोल्हापूर पोलिस घेणार आहेत तसेच तावडेच्या विरोधात ‘सीबीआय’ने जे काही पुरावे गोळा केले आहेत. ते न्यायालयासमोर स्पष्ट केले जातात. त्याची माहिती नोंद करण्यासाठी दोन कॉन्स्टेबलना ‘अलर्ट’ केले आहे. तावडेच्या संपर्कात असणाऱ्या कोल्हापुरातील साधकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस केव्हाही आपल्याकडे चौकशीसाठी येणार, या भीतीने ते पोलिसांच्या हालचालींचा मागमूस काढत आहेत. (प्रतिनिधी)
मनोहर कदमची गोपनीय चौकशी
By admin | Published: June 20, 2016 12:48 AM