कोल्हापूर : लोकशाही प्रक्रियेत सर्वांनी मतदान करावे, असे अभिप्रेत आहे. परंतु उदासीनता, गाफीलपणा आणि प्रशासनाचा बेजबाबदारपणा यांचा मिलाफ झाल्यावर एखाद्या निवडणुकीचा कसा बोजवारा उडतो, याचा प्रत्यय आज, शुक्रवारी झालेल्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आला. चक्क सुशिक्षितांच्या निवडणुकीतील हा गोंधळ केवळ मतदारांनाच नाही, तर येथील जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवायला लावणारा ठरला. खरं तर ही निवडणूक सुशिक्षित मतदारांची होती. परंतु या निवडणुकीत प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळाला उमेदवार, मतदार आणि जिल्हा निवडणूक प्रशासन जबाबदार असल्याचेही स्पष्ट झाले. मतदान करणाऱ्यांपेक्षा मतदान न करणाऱ्यांचीच संख्या मोठी होती. या सगळ्या संतापजनक गोंधळाबद्दल भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार नोंदविली आहे. कोल्हापूर शहरातील १७ शाळांतील ५३ मतदान केंद्रांवरील मतदानास आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आणि प्रशासनाकडून झालेल्या गडबडीची चाहूल लागायला सुरुवात झाली. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीकडून देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्रांनुसार मतदार त्या त्या मतदान केंद्रांवर जायला लागले त्यावेळी कोणाची नावे आहेत आणि कोणाची नावे नाहीत, हे कळायला लागले. उमेदवारांना देण्यात आलेल्या यादीत ज्या मतदाराचे नाव आहे, त्याचे नाव केंद्र अध्यक्षांकडील यादीतून गायब होते. अशा अनेक घटना निदर्शनास यायला लागल्या. त्यामुळे मतदारांमध्ये चलबिचलता निर्माण झाली. पदवीधर मतदारसंघात शहरातील २५ ते ३० मतदान केंद्रांत तर २०० ते ४०० मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचे आढळून आले. अनेक मतदारांना यादीतील गोंधळामुळे एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर असे हेलपाटे मारावे लागले. तीन ते चार ठिकाणच्या केंद्रांवर जाऊनही नावे यादीत न सापडल्यामुळे मतदारांना मतदान करता आले नाही. शहरात मतदाराच्या घरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील मतदान केंद्रावरील यादीत नावे असल्याने अनेकांना बरीच पायपीट करावी लागली. या गोंधळामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली. गेल्या महिन्यापासून जोरदार तयारी केली असतानाही ऐनवेळी यंत्रणेतील गोंधळामुळे मतदानाची टक्केवारी घटल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. शिक्षक मतदारसंघातही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. अनेक अर्ज अपूर्ण राहिल्याने त्यांची नावे यादीत आली नाहीत. अनेक शिक्षकांनी आपले फोटो न दिल्यामुळे त्यांची नावे वगळली गेली. विद्यापीठ हायस्कूलमधील तीन केंद्रांवर सुमारे ४७० शिक्षक मतदारांची नावे वगळल्याचे सांगण्यात आले. मोठ्या हौसेने मतदानाला येणारे शिक्षक यादीत नाव नसल्याने मतदान करता न आल्याने निराश होऊन परत गेले. (प्रतिनिधी)
सुशिक्षितांच्याच निवडणुकीत गोंधळ
By admin | Published: June 21, 2014 12:39 AM