आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १0 : मैलखड्डा येथे सुरू करण्यात आलेला जैविक खत निर्मिती प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांचे भविष्यात आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे बुधवारी प्रकल्पस्थळी उद्घाटनानंतर केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. मात्र, ते नियोजित कार्यक्रमामुळे आधीच निघून गेले होते.
मैलखड्डा परिसर आदीच अनेक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासला आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू करून आणखी आरोग्याच्या समस्या वाढणार आहेत. त्यामुळे हा परिसर अन्यत्र हलवावा, असे म्हणत स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियोजित कार्यक्रमामुळे पालकमंत्री निघून गेले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आपले म्हणणे ऐकून घ्यावे असे म्हणत आयुक्त डॉ. चौधरी यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस व आंदोलक यांच्यात काहीकाळ वाद झाला. यावेळी आयुक्त चौधरी यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत यातून आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाही. याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर अन्य समस्यांबाबत गुरुवारी (दि. १८) महापालिकेमध्ये स्थानिक नगरसेविका वृषाली कदम व नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठक घेतली जाईल. त्यातून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही आयुक्त चौधरी यांनी स्पष्ट केले.
यावेळी आयुक्तांसोबत स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी उपस्थित होते. हे आंदोलन दुर्वास कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यात पवन सुतार, अमोल शिंदे, विनोद तडाखे, रंजना अब्दागिरे, यशवंत चौगुले, सुनील भुरवणे, काशीनाथ कांबळे, सुनील कांबळे, महादेव मस्के, मदिना पठाण, मंगल जाधव, हसिना शेख, रेणुका कांबळे, अलका चौगुले, आदी उपस्थित होते.