इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे. नदीपात्रातील पाण्यावर तेलकट व हिरवट तवंग दिसू लागला असून, हिरवट रंग म्हणजे जलपर्णीची बिजे रुजू लागल्याची चिन्हे आहेत. नजीकच्या दोन-तीन आठवड्यांत प्रदूषणाची तीव्रता वाढत जाऊन नदी जलपर्णीमय होईल, असे चित्र आहे.पंचगंगा नदीमत काठावरील शहरांसह ग्रामीण परिसर, तसेच औद्योगिक सांडपाणी मिसळल्यामुळे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ पंचगंगा ही गटारगंगा झाली आहे. याचा प्रत्यय दरवर्षीच्या उन्हाळ्यात येत असतो. नदीमध्ये असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांमध्ये पाणी साठविले असता पाण्यात मिसळणाºया दूषित पाण्याची तीव्रता वाढत जाऊन नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत जाते. याचा परिणाम म्हणून साधारणत: फेब्रुवारी महिन्यापासून नदीतील पाणी काळसर दिसू लागते. यंदा मात्र जानेवारी महिन्यातच नदीतील पाण्यामध्ये तेलकट व हिरवट तवंग दिसत आहे.प्रदूषणमुक्तीसाठी आमदार उल्हास पाटील व कृषीतज्ज्ञ वसंतराव मुळीक यांनी मागील आठवड्यात पंचगंगा नदी संगम ते उगम अशी परिक्रमा केली. त्याच कालावधीमध्ये तेरवाड येथील बंधाºयातील पाण्यात पाणी दूषित झाल्याने काही मासे मृतावस्थेत आढळले होते. आता इचलकरंजी शहराजवळ पाणी काळसर आणि तेलकट दिसू लागले असल्यामुळे याची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
‘पंचगंगे’ला प्रदूषणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:07 AM