कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्षात उमेदवारी देण्यावरून नेत्यांमध्येच मतभेद निर्माण झाल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. त्यातच जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे पुतणे अनिरुद्ध ऊर्फ बबलू कृष्णराव पाटील हे ताराराणी आघाडीच्या संपर्कात असल्याने तसेच कट्टर समर्थक इंद्रजित सलगर यांनी कॉँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेचा मार्ग धरल्यामुळे कॉँग्रेसमधील नाराजी ठळकपणे पुढे येत आहे. गेल्या पाच वर्षांतील राजकारणास कंटाळून कॉँग्रेसचे नगरसेवक रणजित परमार, रविकिरण इंगवले यांनी यापूर्वीच कॉँग्रेसची साथ सोडून ताराराणी आघाडीचा मार्ग धरला असून, त्यांना उमेदवारीही मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव केल्याच्या भावनेतून नगरसेवक सत्यजित कदम यांनी भाजप-ताराराणी आघाडीचे नेतृत्वच हाती घेतले आहे. इंद्रजित सलगर यांनी कॉँग्रेस पक्षाच्या मुलाखतीस उपस्थिती लावून बिंदू चौक प्रभागातून पक्षाचे तिकीट मागितले होते; परंतु त्यांनी बुधवारी अनपेक्षितपणे घूमजाव करीत कॉँग्रेसच्या उमेदवारीवर पाणी सोडून शिवसेनेचा मार्ग धरला. बुधवारी दिवसभर सलगर यांचा संपर्क झाला नाही. त्यांचे बंधू सुनील सलगर यांच्याशी संपर्क साधून विचारले असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. तथापि, आपला त्यांच्या भूमिकेस पाठिंबा नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. साईक्स एक्स्टेन्शनमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे अनिरुद्ध ऊर्फ बबलू कृष्णराव पाटील हे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या चुलत भावाचे पुत्र आहेत. त्यांनी ताराराणी आघाडीची उमेदवारी मागितली आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक कुलदीप देसाई यांनी साईक्स एक्स्टेशनमधून ताराराणीची उमेदवारी मागितली आहे; परंतु आमदार महाडिक यांचा आग्रह अनिरुद्ध पाटील यांच्यासाठी आहे. खासदार महाडिक यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.
कॉँग्रेस नेत्यांमध्येच उमेदवारीवरून घमासान
By admin | Published: October 01, 2015 12:05 AM