कोल्हापूर : राधानगरीधरणाचा दरवाजा उघडला कसा याबद्दलच संभ्रम तयार झाला आहे. पाटबंधारे विभाग म्हणते की शॉर्ट सर्किटने वीज पंपाची मोटार जळाल्याने हे गेट उघडले तर हे गेट कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. याचा अर्थ हे गेट दुरुस्तीसाठी उघडण्यात आले नव्हते हे स्पष्टच आहे.
राजर्षि शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेल्या या धरणामध्ये त्यावेळी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान जगाच्या पुढे जाणारे होते. धोका पत्करूनच दुरुस्तीची कामे करावी लागतात. याबद्दल पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर म्हणाले, बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास तीन सेवाद्वारांपैकी एक दार खुले होवून पाण्याचा विसर्ग सुुरु झाला. दरवाजा उघडण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.
हे दार वीज पंपाच्या माध्यमातून उघडण्यात येते. त्याच्या स्टार्टरमध्ये बिघाड होवून ते खुले झाले असण्याची शक्यता आहे. किंवा अज्ञाताकडून अथवा धरण स्थळावर इतरत्र चालू असलेल्या कामावरील मजुराकडून अनवधानाने बटन दाबले गेल्याने उघडले असण्याची शक्यता आहे.
अशी आहे व्यवस्था...
- या धरणाला पाणी सोडण्याच्या दोन व्यवस्था आहेत. धरण बांधतानाच त्यांची सोय केली आहे. पावसाळ्यात जेव्हा पाऊस प्रचंड येतो, धरण भरले की धरणातील पाण्याचा विसर्ग व्हावा यासाठी ७ स्वयंचलित दरवाजे आहेत. ते पाणी वाढले की आपोआप उघडतात व पाणी कमी झाले की आपोआप बंद होतात.
- दूसरी व्यवस्था ही शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवण्यासाठी भोगावती नदीत पाणी सोडण्यासाठी आहे. ही एकूण ५ गेट आहेत. त्यातील १ व २ नंबरच्या गेटमधून वीज निर्मितीसाठी कायमपणे पाणी सोडण्यात येते.
- राहिलेल्या तीन गेटची पाटबंधारे विभागाची तांत्रिक शाखा वर्ष-दोन वर्षांतून दुरुस्ती करतो. हे काम मुख्यत: धरणातील पाणी कमी झाल्यावर साधारणत: मार्चनंतर करण्यात येते. एखाद्या गेटबध्दल दुरुस्ती करणे गरजेचे आहे असे वाटले तर ते पावसाळ्यानंतरही लगेच करण्यात येते.
अशी होते दुरुस्ती..
- या ५ ही गेट शिवाय दुरुस्तीवेळी वापरता यावे यासाठी धरणावर प्रचंड अशा आपत्कालीन गेटची सोय आहे. जेव्हा मुख्य गेटची दुरुस्ती करावी लागते तेव्हा पाण्याकडील बाजूस हे आपत्कालीन गेट पाण्यात सोडण्यात येते. ते गेट बसण्यासाठी तसा स्लॉटची व्यवस्था धरण बांधतानाच केली आहे. हे गेट सोडल्याशिवाय दुरुस्तीचे काम केले जात नाही.
- धरण तर भरलेले आहे आणि गेट दुरुस्त करायचे झाल्यास उपाय काय याचा विचार करून या आपत्कालीन गेटची सोय त्यावेळीच केली आहे.
- ही पाचही गेट कायमपणे पाण्यात असतात. त्यामुळे ती गंजतात. त्यांना ग्रिसींग करण्याची गरज असते. शटरचा दरवाजा जसा रोलरवर वर उघडत जातो, तशाच पध्दतीने साखळीच्या साहाय्याने व वीज पंपाच्या मदतीने हे गेट उघडण्यात येते व त्याची दुरुस्ती केली जाते.
काळाच्या पुढे पाहणारे शाहू महाराज...
शाहू महाराज विलायतेत असताना त्यांना ब्रिटिश लोक संपत्तीच्या व शक्तीच्या प्रत्येक साधनाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी किती चांगल्या पध्दतीने करतात हे शाहूंच्या मनांवर ठसले होते. त्यातूनच १९०७ च्या प्रारंभी त्यांनी जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी ही राधानगरी धरणाची योजना तयार केली. बंधारा बांधण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात १९०९ मध्ये आईसाहेब महाराजांच्या हस्ते झाली. म्हणून या तलावाचे नावही लक्ष्मीबाई तलाव असे ठेवण्यात आले..हे धरण म्हणजे कोल्हापूरची जीवनदायिनी ठरले आहे.