कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. आता एकीकडे यूजीसीची सूचना आणि दुसरीकडे राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा यापूर्वी आदेश काढल्याने अंतिम वर्षातील परीक्षा होणार की नाहीत, याबाबत पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील ७५ हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. राज्य सरकारकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीने २९ एप्रिल रोजी विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याची सूचना केली. त्यावर राज्य सरकारने समिती नेमून प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा रद्द करून केवळ अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर शिवाजी विद्यापीठाने कार्यवाही करण्यासाठी कणसे समितीची नियुक्ती केली. या समितीने केलेल्या शिफारशींनुसार परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही वाढला. त्यामुळे राज्य सरकारने तृतीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची आहे, त्यांच्याकडून त्याबाबतचे लेखी संमतीपत्र घेण्याची सूचना विद्यापीठांना केली. बॅकलॉगमधील विद्यार्थ्यांची माहिती मागविली. या निर्णयाची माहिती राज्य सरकारने पत्राद्वारे केंद्र सरकारला दिली. त्यातच आता यूजीसीने सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालय आणि विद्यापीठ या पातळ्यांवर पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
यूजीसीने अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर आता राज्य सरकारच्या आदेशानुसार आणि विद्यापीठ अधिकार मंडळांच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.- गजानन पळसे,प्रभारी संचालक,परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील एकूण महाविद्यालयांची संख्या : २९३
- अंतिम सत्रातील परीक्षा : २२५
- अंतिम वर्षांचे विद्यार्थी : एकूण ७५ हजार
- अंतिम वर्षातील नवीन (फ्रेश) विद्यार्थी : ४५ हजार
- बॅकलॉगमधील विद्यार्थी : २५ हजार
- प्रथम, द्वितीय वर्षांचे विद्यार्थी : एक लाख ४० हजार