कोल्हापूर : कोल्हापुरातील शिये येथील आयओएन डिजिटल झोन परीक्षा केंद्रावर आठ दिवसात पुन्हा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या केंद्रात रविवारी आयबीपीएसमार्फत होणाऱ्या लिपिक परीक्षेदरम्यान सर्व कागदपत्रे सोबत आणूनही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने तणाव निर्माण झाला होता.प्रत्येक परीक्षेवेळी गोंधळ हेच या केंद्राचे वैशिष्ट्य बनले आहे. या केंद्राला टाळे ठोकण्याचा संभाजी ब्रिगेडने इशारा दिला आहे. दरम्यान, या केंद्रावर प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे लक्षात येताच ऑल इंडिया युथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांनी तत्काळ परीक्षा केंद्रावर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.परीक्षार्थींना आधार कार्ड, पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसनपैकी एक पुरावा लागत असतानाही चालकांनी ५० विद्यार्थ्यांना आधारकार्ड अपडेट नसल्याच्या कारणास्तव परीक्षेला बसू दिले नाही. फोटो हुबेहुब दिसत नसल्यावरून गोव्याहून आलेल्या एका विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला, त्याने येताना केस कापले होते, तर कोल्हापुरातील एक विद्यार्थी ५ ऑगस्टला याच परीक्षेसाठी बसला होता. आजही या परीक्षेसाठी त्याने अर्ज भरला होता, त्या दिवशी याच कागदपत्रांवर प्रवेश दिला होता, पण आज त्याला येथे प्रवेश नाकारला.याबाबत केंद्र चालकांना जाब विचारला असता त्याने पळ काढल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नीलेश सुतार यांनी सांगितले. यावेळी पोलिस आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नीलेश सुतार, श्रीनाथ पाटील, नेहा पाटील, स्वाती पाटील, मिलिंद गिरवडे यावेळी उपस्थित होते.युथ फेडरेशननेही विचारला जाबदरम्यान, या परीक्षा केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळ घडल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी जमा झाले. हे कळताच ऑल इंडिया युथ फेडरेशनचे गिरीश फोंडे, राम करे, रवी जाधव यांनीही माहिती घेऊन या अधिकाऱ्यांना जाब विचारला. परीक्षा केंद्रावरील निरीक्षक नितीन जाधव यांनी श्रीनाथ पाटील, मृणाल पोळ, नेहा पाटील, विकास अडोले, ईशा कदम अशा पाचच विद्यार्थ्यांची नावे अहवालातून आयबीपीएसला पाठवल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापुरातील शियेत आयओएन परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थांना प्रवेश नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:47 AM