लोकमत न्युज नेटवर्क
सडोली (खालसा) : हळदी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणूक प्रकियेत मतपत्रिका वाढल्याने मतदान प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला होता. दुपारी अडीच वाजल्यापासून चार तास गोंधळात निवडणूक प्रक्रिया खोळंबली होती. अखेर करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भामरे यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा निवडणूक घेण्यात येऊन सरपंचपदी भाजपच्या विमल बाळासो सुतार व उपसरपंचपदी बाजीराव निवृत्ती पाटील यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील, ग्रामसेवक राजाराम परीट, गावचे तलाठी संजीवनी भोसले यांनी सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेस सुरुवात केली. सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी अकरा स्वतंत्र मतपत्रिका तयार कराव्या लागत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तेरा मतपत्रिका तयार करून मतदान प्रक्रियेस सुरुवात केली. सदस्यांना एकत्रित मतपत्रिका दिल्याने सरपंच पदासाठी तेरा मतदान झाले व उपसरपंच पदासाठी नऊ मतदान झाल्याने निकाल तयार करताना मतदान आकडेवारी पाहून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही बाजूंनी आपलेच म्हणणे रेटत निकालाविषयी आक्षेप घेतल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चूक मान्य केली तरी विरोधक संमती देण्यास टाळाटाळ करत होते. हा सर्व गोंधळ पाहून निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांचा गोंधळ उडाला. सरपंच पदासाठी रूपाली चिंदगे व विमल सुतार या उमेदवार होत्या, तर उपसरपंच पदासाठी सर्जेराव पाटील आणि बाजीराव पाटील हे रिंगणात होते. सायंकाळी साडेसहा वाजता झालेल्या निवडणुकीत विरोधकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. यामुळे भाजपच्या विमल सुतार यांची सरपंचपदी, तर बाजीराव पाटील यांची उपसरपंचपदी सहा विरुद्ध शून्य अशा मतांनी निवड झाली.
निवडणूक प्रक्रिया दिवसभर रेंगाळणे व गोंधळाच्या वातावरणामुळे दिवसभर गावात तणावाचे वातावरण होते. यावेळी ग्रामसचिवालय आवारात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
चौकट
११ उमेदवार असताना तेरा मतपत्रिका तयार केल्या कशा
हळदी, ता. करवीर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ११ उमेदवार असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी १३ मतपत्रिका तयार केल्या कशा, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
फोटो ओळ
हळदी, ता. करवीर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीत गोंधळ झाल्याने वातावरण तापले होते. यावेळी ग्रामसचिवालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
2 निवडणूक प्रक्रिया चुकीची झाल्याने निवडणूक अधिकारी यांच्याशी वाद घालताना सदस्य.
फोटो दिव्या फोटो, गाडेगोंडवाडी