कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसिडिंग वाचण्यावरून जोरदार गोंधळ उडाला. सभाच झाली नाहीतर प्रोसिडिंग मंजूर कसे करता, असा सवाल करता विरोधकांनी शेवटपर्यंत हा मुद्दा लावून धरल्याने गोंधळात भर पडली. अखेर विषयपत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मताने मंजूर करण्यात आले.गोकुळची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरुण नरके होते. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन करताना मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, या पहिल्या विषयावरच विरोधकांनी हरकत घेतली.
मागील सभेत दूध उत्पादकांच्या सत्कारापर्यंत सभा चालली होती, त्यानंतर सभाच झाली नाहीतर विषय आले कोठून, अशी विचारणा किरणसिंह पाटील यांनी केली. सभा झाली आहे, त्याप्रमाणे शासनाने प्रोसिडिंग मंजूर केल्याचे सभाध्यक्ष अरुण नरके यांनी सांगितले. सभा कशी झाली, हे सगळ्या जिल्ह्याने व महाराष्ट्राने पाहिल्याचे सदाशिव चरापले यांनी सांगितले.
यावर विषय मंजूर करत दुसऱ्या विषयाचे वाचन सुरू केले. मात्र, विरोधकांनी काहीसा गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यातच विषयपत्रिकेवरील विषय मंजूर करण्यात आले. संचालक रणजीतसिंह पाटील यांनी आभार मानले.घाणेकरांविरोधात घोषणाबाजीकार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या विरोधात घाणेकर हटाव अशा घोषणा देण्यात आल्या. सेवानिवृत्त होऊनही त्यांना मुदतवाढ का, अशी विचारणाही करण्यात आली.