इचलकरंजी : येथील चांदणी चौक परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचे डोस देत असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. अखेर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर लसीकरण सुरळीत सुरु झाले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. त्यादृष्टीने लसीकरण हे कोरोनावर प्रभावी असल्याने प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. त्यामुळे सहा केंद्रांवर लसीकरण सुरू असून, आणखी सहा केंद्र वाढविण्यात येत आहेत. सध्या ४५ वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. चांदणी चौक परिसरातील गावभाग प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोव्हॅक्सिनचा पहिला, तर कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याचे काम सुरू आहे. यासाठी नागरिक पहाटेपासूनच रांगेत उभे आहेत. कोव्हॅक्सिन व कोविशिल्डसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. परंतु, काही नागरिकांनी थेट लसीकरणासाठी बोलावून घेत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोव्हॅक्सिन व कोविशिल्डसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, टोकन पद्धतीने लस दिली जात आहे. तसेच उपलब्ध लस सर्वांना देण्यात येणार असल्याचे सांगितल्याने लसीकरण व्यवस्थित पार पडले.
फोटो ओळी
१९०७२०२१-आयसीएच-०८
येथील चांदणी चौक परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली.