कोल्हापूर : सर्वसामान्य दूध उत्पादकांना अनेक आश्वासने देवून सत्तेवर आला आहात. पण विचारलेल्या प्रश्नांची डोळ्याला डोळे भिडवून उत्तरे देण्याची हिंमत नाही का अशी विचारणा ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली.येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये ‘गोकुळ’ची सभा गोंधळात पार पडली. गेल्या काही दिवसांपासून सत्तारूढांविरोधात रान उठवलेल्या महाडिक आपल्या समर्थकांसह सभास्थळी आल्या. यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. आधीच सर्व खुर्च्यांवर सभासद असल्याने महाडिक यांनी व्यासपीठावर न जाता सभासदांमध्येच उभे राहणे पसंत केले.चेअरमन विश्वास पाटील यांनी चाळीस मिनिटे भाषण करतानाही त्या त्यांनी आणलेल्या माईकवरून प्रश्न विचारत होत्या. परंतू ते गोंधळात कोणालाच ऐकू येत नव्हते. माजी संचालक रणजितसिंह पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले. मात्र, सत्ताधाऱ्यांनीही सभेचे कामकाज सुरूच ठेवल्याने अखेर तासाभराने महाडिक आणि त्यांचे समर्थक हॉलबाहेर पडले.यानंतर माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये समांतर सभा घेण्यात आली. त्यावेळी महाडिक म्हणाल्या, सत्ता मिळाल्यानंतर खांद्यावरून नाचत आलेल्यांनी सभासदांना दिलेली आश्वासने पूर्ण का केली नाहीत याचे उत्तर द्यावे. वासाचे दूध परत करतो इथंपासून चार रूपये दरवाढीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले अशी विचारणा महाडिक यांनी केली. यावेळी माजी संचालक रणजितसिंह पाटील, धैर्यशील पाटील, दीपक पाटील, सत्यजित कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तरे देण्याची हिंमत नाही का, शौमिका महाडिक यांचा सवाल; ‘गोकुळ’च्या सभेत गोंधळ
By समीर देशपांडे | Published: August 29, 2022 3:40 PM