इचलकरंजी : येथील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सर्वसाधारण सभेची वेळ बदलल्याने गोंधळ उडाला. या गोंधळातच विषयपत्रिकेवरील विषय मंजुरीच्या घोषणा देत सत्ताधारी गटाने सभा आटोपती घेतली. दरम्यान, ही सभा बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी व शिक्षण उपसंचालकांकडे विरोधी गटातर्फे तक्रार करण्यात येणार आहे.शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांना पुरविलेल्या विविध शैक्षणिक साहित्यांची बिले अदा करणे, यासह रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन क्र. २७ या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करणे, अशा आठ विषयांसाठी ही सभा बुधवारी बोलाविण्यात आली होती. या सभेची वेळ सायंकाळी चार वाजता होती. मात्र, प्रशासन अधिकाऱ्यांची बदली झाल्याने ते येथील पदभार सोडून जाणार असल्याने सभेची वेळ बदलून सकाळी अकरा वाजता सभा ठेवण्यात आली. ही बाब कायदेशीर नसल्याचा आरोप करीत विरोधी कॉँग्रेस पक्षाने सभा बेकायदेशीर आहे, ती रद्द करावी, अशी मागणी करीत सभेवेळी गोंधळ सुरू केला. तर नियमानुसारच सभा घेतल्याचे सांगत सभापती नितीन कोकणे यांनी सभेचे कामकाज सुरू केले. दोन्ही बाजूंच्या घोषणाबाजीमुळे उडालेल्या गोंधळाच्या वातावरणातच सभा गुंडाळली. (वार्ताहर)सभा कायदेशीरच : सत्ता गेल्यानेच कॉँग्रेस सदस्यांचा विरोधप्रशासन अधिकारी सी. आर. काळे यांची बदली चंद्रपूरला झाल्याने तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सायंकाळची सभा सकाळी घेतली. त्याचे रीतसर शुद्धिपत्रक सर्व सदस्यांना वेळेत पोहोचविले. त्यानुसार सर्वांनी उपस्थिती लावत प्रोसेडिंगवर सह्याही केल्या आहेत. त्यामुळे ही सभा कायदेशीर पद्धतीनेच पार पडली आहे. मात्र, ५० वर्षांची सत्ता गेल्याचा राग मनात धरून मुद्दाम विरोध करण्यासाठी कॉँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला. या गोंधळामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार याचीही तमा बाळगली नाही, असा आरोप सभापती नितीन कोकणे यांनी सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
शिक्षण मंडळाच्या सभेत गोंधळ
By admin | Published: May 26, 2016 12:36 AM