कोल्हापूर : कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढण्यास सुरूवात झाल्याने जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गोकुळ आणि जिल्हा बँकेची होणारी संभाव्य निवडणूक आणि अध्यक्षपदावर आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी केलेला दावा, अशा परिस्थितीमध्ये याबाबतच्या हालचाली थंडावल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील कोरोनातून बरे होऊन आता कार्यरत झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात याबाबत काय निर्णय होतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेला महिनाभर पदाधिकारी बदलाची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री पाटील अमेरिकेहून आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते. पाटील आल्यानंतर मुंबईत कोरोनाबाधित झाल्याने पंधरा दिवस ते कार्यरत नव्हते. ते सोमवारपासून सक्रिय झाले आहेत. अशातच राज्यात पुन्हा कोरानाने डोके वर काढले असून अनेक जिल्ह्यांतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन सज्ज होत आहे. अशा परिस्थितीत विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन पुन्हा नव्या निवडीच्या जोडण्या घालणे म्हणावे तेवढे सोपे नाही.
चौकट
दोन्हीकडून दावा
कोरोना आणि अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी बदलाची रिस्क नेते घेणार नाहीत, अशी भाबडी आशा पदाधिकारी बाळगून आहेत. नेते सांगतील तेव्हा राजीनामा देणार, असे सांगतानाच मुदतवाढ कशी मिळेल याच प्रयत्नात आहेत. काही सदस्य काठावर आहेत असे सांगत नव्या निवडी नकोत, असा नेत्यांना संदेश दिला जात आहे. दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीतील दोष सांगून बदल करण्याची गरज इच्छुक पटवून देत आहेत. त्यामुळे नेत्यांचीही पंचाईत झाली आहे.