कोल्हापूर : रात्री आठनंतरच्या जमावबंदीवरून व्यावसायिकांमध्ये मोठा संभ्रम आहे. मोजके व्यवसाय यावेळेनंतर बंद ठेवायचा आदेश असताना सर्व दुकाने, आस्थापनेही बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे शासनाचा आदेशाचा नेमका अर्थ काय, स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाने काय निर्णय घेतला आहे हे स्पष्ट करावे, अशी व्यावसायिकांची मागणी आहे. यासाठी आज गुरुवारी चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाने रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मॉल, चित्रपटगृह अशा मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्याची ठिकाणे रात्री आठनंतर बंद करण्याचे शासनाच्या आदेशात नमूद आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात या सोबत सर्व प्रकारची दुकाने व आस्थापने आठ वाजता बंद केली जात आहेत. पथकाच्यावतीनेही बंदचे आवाहन केले जात आहे.
--
सध्या सरसकट सगळी दुकाने आठला बंद केली जात आहेत. पण नेमका आदेश काय आहे, खरंच आठनंतर दुकाने बंद करायची असेल तर जिल्हा प्रशासनाने ते स्पष्ट करावे, अशी विनंती आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना करणार आहोत.
संजय शेटे
अध्यक्ष कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स)
--
संसर्ग वाढायचा नसेल तर निर्बंध गरजेचे
सध्या कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी दिवसेंदिवस ती वाढत आहे. गेल्यावर्षीसारखी गंभीर स्थिती व्हायची नसेल, संसर्गाचे प्रमाण वाढायचे नसेल तर आता घातलेले निर्बंध योग्य आहेत. जगणं सुरळीत ठेवायचं असेल तर नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करायची तयारी सर्व घटकांनी दाखवली पाहिजे, असाही सूर नागरिकांमध्ये आहे. लोकांना दिवसभर खरेदीसाठी मुभा असते. निर्बंध घातल्याने रात्रीची अनावश्यक गर्दी टाळली जात आहे.
--